सगे सोयरे अधिनियम बाबत मराठा समाज आक्रमक
24 तारखेपासून मराठा आंदोलक “आदर्श रास्तारोको”आंदोलन करणार
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा आरक्षण संदर्भात राज्य शासनाच्या वतीने फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करत येत्या दोन दिवसात सगेसोयरे बाबतीत चा अधिनियम लागू करावा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असून येत्या 24 तारखेपासून गावोगावी ‘आदर्शरास्ता रोको ” करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आंदोलन बाबत नेहमीच अग्रेसर असलेल्या अहमदपूर सकल मराठा समनव्यय समितीच्या वतीने देण्यात आली.
आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी काल अंतरवाली सराठी येथे महाराष्ट्रातून आलेल्या मराठा बांधवासोबत झालेल्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली त्या पार्श्वभूमीवर अहमदपूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काल सायंकाळी सकल मराठा समाज समनव्यय समितीची बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थित समाज बांधवांनी शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला यावेळी सर्वानुमते खालील निर्णय घेण्यात आले
यामध्ये 24 तारखेपासून बेमुदत आदर्श रास्ता रोको अहमदपूर येथील रायगड चौक येथे करण्यात येणार असून त्यानंतर टप्याटप्याने गावोगावी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी तालुक्यातील सर्व गावांना या मध्ये सहभागी करण्यात येणार आहे.
राजकीय नेत्यांनी त्यात आमदार खासदार मंत्री यांना गाव बंदी करण्यात आली असून कोणत्याही राजकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे प्रचार वाहन गावा गावामध्ये जप्त करण्यात येणार आहेत राजकीय लोकांनी सहकार्य करावे अन्यथा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर सकल मराठा समाजातर्फे दिले जाईल. येत्या 3 मार्च ला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्व मराठा समाजातील आजी माजी सरपंच,नगरसेवक,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तसेच सर्व पक्षाचे तालुका जिल्हा अध्यक्ष तथा राजकीय व्यक्ती यांनी आरक्षण मागणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पक्षाकडे जाऊ नका म्हणजे जातीच्या विरोधात जाऊ नका अन्यथा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मदतीला मराठा समाज येणार नाही असा ठराव संमत करण्यात आला याबाबत सर्व राजकीय पुढाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समन्वय समिती अहमदपूर यांच्या वतीने करण्यात आले.