बाजार समितीच्या संदर्भात शिवाजीराव हूडे यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल

0
बाजार समितीच्या संदर्भात शिवाजीराव हूडे यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल

बाजार समितीच्या संदर्भात शिवाजीराव हूडे यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये शिवाजीराव हुडे यांची याचिका दाखल होती. या याचिके संदर्भात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने शिवाजीराव हुडे यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यासंदर्भात थोडक्यात अशी की, 2023 मध्ये उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. या निवडणुकांमध्ये शिवाजीराव हनुमंतराव हुडे आणि भगवानराव पाटील तळेगावकर या दोघांचे पॅनल समोरासमोर होते. या निवडणुकात भगवानराव पाटील तळेगावकर वगळता त्यांच्या पॅनलचा पराभव झाला, आणि या निवडणुकीमध्ये शिवाजीराव हुडे यांचा आणि त्यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला. यानंतर शिवाजीराव हुडे हे सभापती झाले. शिवाजीराव हुडे यांना शह देण्यासाठी त्यांच्या विरोधकानी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे कलम 72 (अ) प्रमाणे शिवाजीराव हुडे व निवडून आलेल्या सर्व संचालका विरोधात रमेश भंडे व धनाजी गंगनबीडे यांनी निवडणूक याचिका दाखल केली.
सन 2017 च्या निवडणुका नियमानुसार ही याचिका निकाल जाहीर झाल्यापासून सात दिवसाच्या आत दाखल करणे गरजेचे होते, परंतु ही याचीका यानंतर दाखल करण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी ही दाखल केलेली याचिका मुदतीत नाही, म्हणून फेटाळून लावली. परंतु काही दिवसात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांची बदली झाली. आणि नवीन अधिकारी दाखल झाले. त्यानंतर पुन्हा शिवाजीराव हुडे यांच्या विरोधकांनी या संदर्भात परत पुनर्विचार याचिका दाखल केली. या याचिकेवर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री बदनाळे यांनी सर्व संचालकांना नोटीस देऊन सुनावणीसाठी परत हजर राहण्याच्या आदेश दिले.
यासंदर्भात शिवाजीराव हुडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये संचालका तर्फे ऍड.उद्धव मोमले, ऍड.पांचाळ, ऍड.पद्माकर उगिले ऍड. अजय डोणगावकर हे हजर होऊन संचालकातर्फे युक्तिवाद केला. यामध्ये त्यांनी सदरील प्रकरणात जिल्हा उपनिबंधक यांना सदरील पुनर्विचार याचिका चालवण्याचा अधिकार नाही, हा मुद्दा उपस्थित केला. कारण नियम 2017 मध्ये कुठेही पुनर्विचार याचिका बद्दल कायद्यामध्ये तरतूद नाही. परंतु जिल्हा उपनिबंधक यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका बेकायदेशीरपणे मंजूर केली. या नाराजीने शिवाजीराव हुडे यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली.
सदरील याचिकेची सुनावणी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस जी मेहरे यांच्या खंडपीठासमोर चालवण्यात आली. या याचिकाकर्त्या तर्फे वरिष्ठ विधीज्ञ महेश देशमुख यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने दाखल केलेली याचिका मंजूर केली. व जिल्हा उपनिबंधक यांनी दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी दिलेले आदेश रद्द केले. जिल्हा उपनिबंधकांना सदरील प्रकरणात पूनर्निरिक्षण अर्ज चालवण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांनी दिनांक 12 जानेवारी रोजी दिलेला आदेश चुकीचा असल्याने ते रद्द केले. त्यामुळे शिवाजीराव हूडे यांच्या विरोधात दाखल केलेली निवडणुक याचीका ही फेटाळण्यात आली. ती कायद्याने बरोबर आहे. असे नमूद करण्यात आले. सदरील प्रकरणात याचिकाकर्त्या तर्फे विधिज्ञ महेश देशमुख, उद्धव मोमले,त्रिपाठी यांनी काम पाहिले.

बाजार समितीच्या संदर्भात शिवाजीराव हूडे यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल

चौकट…..
मतदारांच्या मताचा आदर करावा – सभापती शिवाजीराव हुडे

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या हितासाठी चालवली जाणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये ज्या संचालकांना मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. त्या मतदाराच्या मताचा आदर करून, विजयी झालेल्या संचालक मंडळांना जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून प्रत्येक वेळी कोर्टकचेरीत वेळ घालवण्याचे विरोधकांनी टाळावे. जेणेकरून संचालक मंडळाला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला वेळ मिळेल. जनतेने आम्ही यापूर्वी केलेल्या कामाची पावती म्हणून आम्हाला विजयी केले आहे.
आमच्यापेक्षा नवीन पुढारी चांगले काम करतील म्हणून गेल्या वेळेस आमचा पराभव झाला. त्यावेळेस आम्ही तो पराभव मोठ्या मनाने स्वीकारला. लोक मताचा आदर करून तत्कालीन संचालकांना काम करण्याची पूर्ण मुभा दिली, कोणतीही अडचण आणली नाही. मात्र मतदारांना जेव्हा आपली चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी पुन्हा आमच्या पॅनलला बहुमताने विजयी करून एकतर्फी सत्ता आमच्या हातात दिली आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी पालकमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. अमित भैया देशमुख, आ. धीरज भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीची वाटचाल विकासात्मक आणि लोककल्याणकारी योजना राबवण्याकडे चालू आहे. विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरीही जनमताचा आदर करत आम्ही लोककल्याणाची कामे चालूच ठेवणार आहोत. असे विचार उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *