भाई नगराळे यांची राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या संपर्क कार्यालयाला भेट
उदगीर (एल.पी.उगीले) : देशात लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर लातूर लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडी तर्फे इच्छुक उमेदवार भाई नगराळे यांनी मतदारसंघात गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. उदगीर येथे राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला.
याप्रसंगी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष, उदगीर नगरपालिकेचे माजी नियोजन सभापती निवृत्तीराव सांगवे यांच्यातर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोईजभाई शेख हेही उपस्थित होते.
सुसंवाद बैठकीचे प्रास्ताविक या बैठकीचे संयोजक निवृत्तीराव सांगवे यांनी केले. राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष आ. जिग्नेश भाई मेवाणी यांनी इंडिया आघाडीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते इंडिया आघाडी सोबत राहतील, असे आश्वासन याप्रसंगी निवृत्तीराव सांगवे यांनी दिले.
याप्रसंगी बोलताना मोईज भाई शेख यांनी सांगितले की, सध्या देशात आणि राज्यात जे सरकार आहे ते प्रादेशिक पक्ष संपुष्टात आणण्यासाठी कूटनीतीचा अवलंब करत आहे. विरोधक संपुष्टात आणण्यासाठी पक्षांतर्गत फूट पाडून बंडाळी माजवण्याचा चालवलेला प्रयत्न जनता हाणून पाडेल. इंडिया आघाडी सर्व धर्म समभाव हा विचार घेऊन चालणारी असल्यामुळे 18 पगड जाती इंडिया आघाडी सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना इच्छुक उमेदवार भाई नगराळे यांनी स्पष्ट केले की, लातूर जिल्हा हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. ते गत वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करणे गरजेचे आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने सतत खोटी आश्वासने दिलेली आहेत. अच्छे दिन येणार म्हणून अशाळभूतपणे आजही सर्वसामान्य माणूस वाट पाहतो आहे. मात्र प्रत्यक्षात महागाईने जगणे कठीण करून ठेवले आहे. समाजामध्ये महिला वरील अत्याचार वाढले आहेत. जाती-जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे पाप भारतीय जनता पक्ष करत आहे. यामुळे विकास तर सोडाच, देश अधोगतीकडे चालला आहे. देशातील सर्वच शासकीय विभाग खाजगी कंपन्याला विकण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे प्रचंड बेकारी वाढली आहे. नोकरीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेकार, बेरोजगार हाताश होऊ लागला आहे. उद्विग्न झालेला तरुण आत्महत्या कडे वळू लागला आहे. प्रचंड महागाई आणि शेतीमालाला मिळणारा तुटपंजा भाव, वाढलेली महागाई यामुळे शेतकरी ही आत्महत्या करू लागला आहे. मात्र सर्वसामान्य माणसांच्या या प्रश्नापेक्षा रोज नवीन नवीन भूलथापा आणि खोटी आश्वासने दाखवण्यात पटाईत असलेली जाहिरातबाजी हीच भारतीय जनता पक्षाची एकमेव कमाई आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सध्या सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेले आहेत. भारतीय राज्यघटना बदलण्याचा डाव देखील भारतीय जनता पक्षाने रचला आहे. हे सर्व हाणून पाडण्यासाठी इंडिया आघाडीला बहुमताने विजयी करणे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य बनले आहे. युवकांनी यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे भाई नगराळे यांनी सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन रवी जवळे यांनी तर आभार प्रदर्शन मुकरम जागीरदार यांनी केले. राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मंजूर खा पठाण, राजू भालेराव, श्रीरंग कांबळे,मुन्ना मदारी, विलास गायकवाड यांच्यासह भीम आर्मी, बंजारा समाज, दलित मुस्लिम आघाडी इत्यादी संघटनांचे पदाधिकारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.