श्यामलाल हायस्कूल मध्ये स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. या दिवशी स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्वेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडून प्रभावीरीत्या एक दिवसाची शालेय कामकाज पार पाडले. स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक म्हणून बिराजदार शुभांगी बसवराज या विद्यार्थिनीने प्रभावीरीत्या कार्य केले, उपमुख्याध्यापक म्हणून मुदुडगे यशश्री या विद्यार्थिनीने काम पाहिले, पर्यवेक्षक म्हणून पटवारी आदिती, तानाजी लामतुरे या विद्यार्थ्यांनी कार्य पाहिले. तसेच 40 विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून प्रभावीरीत्या अध्यापन करण्याचे कार्य केले. स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने शिक्षक म्हणून कार्य करण्याचा आगळावेगळा अनुभव आणि ते कार्य करत असताना येणाऱ्या समस्या कशा असतात याचे अनुभव कथन स्वयंशासन दिनाच्या समापन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केले, शिक्षकांचे कार्य खरंच खूप मेहनतीचे, महत्त्वाचे आणि सर्जनशील असते.असे अनुभव कथन विद्यार्थ्यांनी केले.
स्वयंशासन दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच शाळेचे मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, पर्यवेक्षक राहुल लिमये, ज्येष्ठ शिक्षक संजय देबडवार, नारायण कांबळे, शेख सईद, सतीश बिरादार या सर्वांनी स्वयंशासन दिन यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शन केले.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते, श्यामलाल हायस्कूलचे पर्यवेक्षक राहुल लिमये, ज्येष्ठ शिक्षक संजय देबडवार, नारायण कांबळे, प्रा. खंदारे भारत, लिपिक राजारूपे शिवाजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
निरोप समारंभाच्या निमित्ताने शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव याप्रसंगी व्यक्त केले. श्यामलाल शाळा ही खरंच आम्हा विद्यार्थ्यांना एक दीपस्तंभ प्रमाणे मार्ग दाखवणारी आदर्श शाळा आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या शाळेमध्ये खूप उपक्रम राबवले जातात, याचा आम्हाला विद्यार्थी म्हणून खूप आनंद वाटतो, खूप काही कौशल्य विविध उपक्रमातून आम्ही शिकलो, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे महान कार्य ही शाळा व या शाळेतील शिक्षक वृंद करतात, प्रत्येक विषय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला जातो, परीक्षेसाठी जादा तास घेऊन तयारी करून घेतली जाते. त्यामुळे आम्हाला आता बोर्ड परीक्षेची कसलीही भीती वाटत नाही, आत्मविश्वासाने आम्ही परीक्षेला सामोरे जाऊ शकतो, ही शाळा आम्ही कधीही विसरू शकणार नाही. असे अनुभव कथन विद्यार्थ्यांनी केले.
अध्यक्षीय समारोप मध्ये संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेस सामोरे जात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास न गमावता उत्साहाने पुढील शैक्षणिक वाटचाल करावी, यापुढे तुमच्यासाठी अनेक क्षेत्र खुले आहेत आपल्या अंगभूत कौशल्याच्या आधारे एक वेगळी पाऊलवाट आपण निर्माण करावी व यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचावे, कोणतेही क्षेत्र कमी नाही फक्त प्रामाणिकपणे, जिद्द,जोश आणि मेहनतीच्या आधारे आपण यश संपादन करू शकतो, भविष्यात आपण कितीही मोठे झालो तरी आपली मातृभूमी, आपला देश आणि माणुसकी यांचा कधीही विसर पडू देऊ नका. मनूर्भव हे ब्रीद सदैव स्मरणात राहू द्या. असे मार्गदर्शन या प्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हके नामदेव यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य कावरे प्रमोद यांनी केले.