जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) : जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता निडवदे या होत्या. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते प्रा. डॉ.गौरव जेवळीकर ,प्रमुख पाहुणे युवा उद्योजक अमोल अनकल्ले, कार्यक्रम प्रमुख कुणाल शिंदे होते.
पुढे बोलताना डॉ. जेवळीकर म्हणाले, महापुरुषांना जोपर्यंत आपण नीट समजून घेणार नाही तोपर्यंत आपण त्या वाटेने चालू शकणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नव्हती, तर ती एक संस्था होती, प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आपण कृती केली तर निश्चितच समाजोपयोगी, लोकोपयोगी कार्य आपल्या हातूनही घडेल. अध्यक्षीय समारोप करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुजाता निडवदे म्हणाल्या, समता नगर येथील पंडित दीनदयाळ प्राथमिक विद्यालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरतीच चालत आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग कसा काढावा, याची शिकवण शिवचरित्रातून आम्ही व आमचे विद्यार्थी घेत आहोत.
या बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान वक्तृत्व स्पर्धेत प्रथम श्रेया माने वर्ग सहावी, द्वितीय आदित्य पांडे वर्ग सातवी व तृतीय पूजा ढेके वर्ग आठवी आलेल्या तसेच निबंध स्पर्धेत प्रथम अवनी वाघमारे वर्ग सहावी, द्वितीय राधिका केंद्रे वर्ग पाचवी व तृतीय शाहीन मुंजेवार वर्ग सहावी आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिज जाधव यांनी तर आभार दिलीप ठाकूर यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.