अभिजात मराठी भाषा होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – सौ. नीता मोरे
उदगीर (एल.पी.उगीले) : मातृभाषा मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कार्य करणे खूप महत्त्वाचे आहे, असे उद्गार प्रसिद्ध साहित्यिका तथा लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथील सहशिक्षिका सौ . नीता मोरे यांनी श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना म्हंटले आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिका सौ. नीता मोरे, सौ. उज्वला वडले, प्रा. सौ. सीमा मेहत्रे, कनिष्ठ विभागाचे विभाग प्रमुख प्रा. युवराज दहिफळे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
पूढे बोलताना सौ. नीता मोरे म्हणाल्या, महाराष्ट्र ही आपली मातृभूमी तर मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचे वाचन करुन कथा, कविता लिहिण्याचा प्रयत्न करावा.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले,विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात जाऊन पुस्तके घेऊन त्याचे वाचन करावे. मराठी भाषेच्या शिक्षकांनी दर्जेदार साहित्याचे लेखन करावे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा अल्प परिचय एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार प्रा. युवराज दहिफळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, शिवकुमार कोळ्ळे, विनायक करेवाड, बालाजी कांबळे, श्रीकांत देवणीकर, उमाकांत नादरगे यांनी सहकार्य केले.