बेनिनाथ कंपनीने परिसरातील शेतकऱ्यांचे हित जोपासले, मेळाव्यात अनेकांचे कौतुकाचे बोल
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करून गरजूंना शासनाच्या योजनांच्या अंतर्गत शेतीसाठी उपयुक्त असलेल्या साधनसामग्रीचे वाटप ही वेळोवेळी केले आहेत. अशा शेतकरी हिताची जाण जपणाऱ्या कंपनीचा आदर्श जिल्ह्यातील इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी घ्यावा. असे आवाहन करतानाच बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीने आज पर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव अनेक कृषी अधिकारी आणि अफॉर्म चे अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांनी केला आहे.
बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने भव्य असा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. नाबार्ड द्वारा स्थापित व अफार्म संस्था मार्गदर्शित व बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीने आयोजन केलेला हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, मंडळ कृषी अधिकारी मुळजे, कृषी पर्यवेक्षक चव्हाण तसेच अफार्म संस्थेकडून आलेले विभागीय संचालक राजेंद्र इंगळे, अफार्मचे संचालक सचिन पुणेकर, यशवंत गायकवाड तसेच बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले, उपाध्यक्ष विजया सावंत, सीमा साखरे, भास्कर जाधव, लहू नरहरे, राम सावंत, अंगद कांबळे, पद्माकर मोगले, पंतप्रधान अन्नप्रक्रिया उद्योगाचे शिंदे पाटील, महाराष्ट्र शासनाने कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केलेले श्याम भाऊ सोनटक्के, मोहन पाटील यांच्यासह कंपनीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मोहन पाटील यांनी स्पष्ट केले की, आपण 2021 सालि या कंपनीचे सदस्य झालो. तेव्हापासून कंपनीकडून मला बियाणे, औषधे, कृषी विषयक माहिती, प्रशिक्षण तसेच शेतमाल कंपनीकडून विक्री करत आहे. यापुढे कंपनीने फवारणी करण्याकरिता ड्रोनची मागणी केली आहे, असे सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञान या संस्थेला पुरवल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच होणार आहे. असेही त्यांनी सांगितले. सुनील पावडे या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना या संस्थेने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे, असे सांगितले. याच मेळाव्यामध्ये श्याम भाऊ सोनटक्के यांचा सत्कारही करण्यात आला. बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीने आजपर्यंत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कंपनीच्या कार्याची दखल घेऊन कृषी विभागाच्या वतीने कृषी अवजारे 25 लाखाची दिले आहेत. तसेच गोडाऊन 25 लाखाचे, यासोबतच विविध योजना या कंपनीला दिल्या जातील असे आश्वासनही याप्रसंगी वरिष्ठांनी दिले. शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभ घ्यावेत, शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ घेत फळबाग लागवड करावी, झाडे लावा, कितीही अडचण असली तरीही आत्महत्या करू नका, त्यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. नवीन वाणाची पेरणी करावी, तसेच कंपनी करत असलेल्या कामाचे कौतुक करून असा आदर्श इतरांनी घ्यावा, असेही आवाहन केले.
यानंतर शिंदे पाटील, सचिन पुणेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेनिनाथ कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले तसेच सर्व संचालक व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कंपनीचे संचालक पद्माकर मोगले यांनी केले.