ग्रामीण जीवनाचे राहणीमान उंचावल्यास भारत लवकरच विकसित राष्ट्र होईल
सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे
लातूर (प्रतिनिधी) : भारतातील बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात त्यांचे सर्वांगीण जीवनमान उंचावले तरच भारत विकसित राष्ट्र होईल असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड सलग्नित राष्ट्रीय सेवा योजना, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय, जवळा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष युवक शिबिर मौजे जवळा बु. येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात कृषी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारपिठावर डॉ. गुणवंत बिरादार, प्रा. रवींद्र सुरवसे, प्रा. व्यंकट दुडीले, कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. मनोहर चपळे, प्रा. किसनाथ कुडके आदीची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. ठोंबरे म्हणाले की, देशाचे मानवी संसाधन, लोकसंख्या नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा विनियोग झाला पाहिजे. देश विकासात मानवी संसाधनाचे विशेष महत्त्व असते. ग्रामीण जीवनात सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थिती अत्यंत बिकट आहे. शहरे मोठी होत चालली आहेत आणि खेडी ओस पडत आहेत. ग्रामीण भागातील आहार विहाराचे अनेक प्रश्न सातत्याने भेडसावत आहेत अशा वेळेला शासनाने जाणीवपूर्वक ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करून त्यांचा विकासाचा ध्यास घेतला पाहिजे तरच आत्मनिर्भर भारताचे आणि विकसित राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, ग्रामीण भाग देशाच्या विकास विकासाची संजीवनी आहे. ग्रामीण भागावरच देशाच्या सर्वांगीण विकासाचा भार आहे. शेतकरी आणि कष्टकरी रोजगारी यांचे श्रम मूल्य सर्वाधिक आहे. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष न करता खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होईल असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. किसनाथ कुडके यांनी केले आणि आभार डॉ. गुणवंत बिरादार यांनी मानले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी योगेश मोदी आणि शिबिरार्थी परिश्रम घेत आहे.