मुस्लिम आरक्षणाचा विषय अर्ध्यावर सोडणार नाही – निवृत्ती सांगवे
उदगीर (एल.पी.उगीले) : मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण देऊन संरक्षण द्यावे आणि विकासाच्या प्रवाहात मागास असलेल्या मुस्लिम प्रवर्गाला देखील बरोबर घ्यावे. या मागणीसाठी राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि भारतीय दलित पॅंथर, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती यांच्या वतीने 18 सप्टेंबर 2023 रोजी पासून आपण आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला बेमुद्दत धरणे आंदोलन आणि त्यानंतर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उदगीरचे आमदार तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी आश्वासन देणारे पत्र देऊन आंदोलन थांबवले होते. कर्मधर्म संयोगाने त्याच काळात मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बैठका घेऊन आशादायक वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र तब्बल सहा महिने होत आले तरी अजूनही शासनाच्या वतीने कोणतीही हालचाल केली जात नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. शासनाला मुस्लिम आरक्षणाची आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा मराठवाडा पातळीवरील सर्व मान्यवर नेतेमंडळींना एका व्यासपीठावर घेऊन मुस्लिम आरक्षणाचा विषय ऐरणीवर घेण्यात येणार असल्याचे विचार पॅंथर नेते निवृत्तीराव संभाजी सांगवे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहेत.
या अनुषंगाने नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, भारतीय दलित पॅंथर यांच्या संयुक्त विद्यमानाने मुस्लिम आरक्षण समीक्षा बैठक, मेळावा व पत्रकार परिषदेचे आयोजन दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता रघुकुल मंगल कार्यालय, शाहू चौक उदगीर येथे करण्यात आले असून या मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान तसेच या विषयाची जाण असलेले नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनारीटी चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे हे मेळाव्याचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अजित पठाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच जनजागृतीसाठी काढण्यात येणाऱ्या महारॅली चे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोईज भाई शेख, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सेवानिवृत्त आयएएस अधिकारी भा.ई. नगराळे, भारतीय दलित पॅंथरचे अध्यक्ष लक्ष्मणराव भुतकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक पॅंथरनेते निवृत्तीराव सांगवे, राजा मणियार, मोहसीन खान, सनाउल्लाह खान, मधुकरराव एककुरकेकर, देविदास कांबळे , विधिज्ञ प्रकाश काळे, मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे उदगीर तालुकाध्यक्ष इरफान शेख, सुवर्णाताई डंबाळे, सय्यद बलिगाबी, डॉ. अंजुम खादरी, सुश्मिता माने (जाधव) यांनी केले आहे. या मेळाव्याचे निमंत्रक म्हणून मुक्रम जागीरदार हे राहणार आहेत.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिलेले असून मुस्लिम समाजाच्या हिताचा विचार करून तसेच सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, या सद्भावनेने राजकीय विषय बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करावे. आणि मुस्लिम समाजाला शिक्षण, आरक्षण, संरक्षण द्यावे. ही प्रमुख मागणी घेऊन आपला लढा कायम राहणार आहे. या लढ्याची पुढील दिशाही दिनांक 10 मार्च रोजी च्या मेळाव्यामध्ये निश्चित केली जाईल, असेही निवृत्तीराव सांगवे यांनी स्पष्ट केले आहे.