स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर – घुगे यांच्या हस्ते अनावरण
उदगीर (एल.पी.उगीले) : स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन दि.०८ ते १२ मार्च २०२४ या कालावधीत तालूका क्रीडा संकुल उदगीर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण दि. ०६ मार्च २०२४ रोजी दुपारी १२.३० वा. लातूरच्या जिल्हाधिकारी तथा स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा समितीच्या कार्याध्यक्ष श्रीमती वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते आॅनलाईन पध्दतीने उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले.
या प्रसंगी क्रीडा व युवक सेवा पुणे येथील उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, दत्तात्रय गडपल्लेवार क्रीडा अधिकारी, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, सुधीर भोसले, अॅड. गुलाबराव पटवारी, प्रा.श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, समीर शेख, जानीमियाँ सय्यद, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, उदयसिंह ठाकुर, गणेश गायकवाड, शशिकांत बनसोडे, संघशक्ती बलांडे, व्यंकट बोईनवाड, अहमद सरवर, निजामोद्दीन शेख, शेख इफ्तेखार, आदी उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये राज्यातील ३६० कुस्तीपटु, व्यवस्थापक व मार्गदर्शक यांच्यासोबतच तांत्रीक समिती सदस्य, पंच, सामनाधिकारी, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी तसेच स्वयंसेवक दि. ०८ मार्चपासुन सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या नामवंत मल्लांची दि.०९ मार्च २०२४ रोजी सकाळी उदगीर शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात येणार असुन यामध्ये स्व. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत जाधव यांच्यासह राज्यातील अर्जुन पुरस्कारार्थी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, नामांकित पैलवान, महाराष्ट्र केसरी पेलवान उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन दि.०९ मार्च २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता ना. गिरीश महाजन, मंत्री ग्रामविकास व पंचायतराज तथा पालकमंत्री लातूर यांच्या अध्यक्षतेखाली, ना. संजय बनसोडे, मंत्री क्रीडा व युवक कल्याण, बंदरे महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी खा. रामदास तडस, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, जिल्हयातील लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर स्पर्धा दि. ०९ ते ११ मार्च या कालावधीत सायंकाळी ५.०० ते १०.०० या वेळेमध्ये या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा आनंद लातूर जिल्हयातील जास्तीत जास्त कुस्तीप्रेमी नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.