आत्मसात केलेल्या ज्ञान आणि कौशल्याचा पशुसखीनी प्रसार करावा – सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड
उदगीर (एल.पी.उगीले) : ग्रामीण कुटुंबात शेळीसंगोपनाची बहुतांश जबाबदारी महिलाकडेच असते. त्यामुळे विस्तार उपक्रमात महिलांची सहभागिता वाढविणे आवश्यक आहे. शेळीपालन महिलाना सहजसाध्य असून त्यातून आत्मनिर्भरता सहज शक्य आहे. पशुसखीनी आत्मसात केलेले ज्ञान आणि कौशल्याचा इतर महिला शेळीपालकापर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी केले. बीड जिल्ह्यातील पशुसखीसाठी उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारोप प्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. दूरस्थ प्रणालीद्वारे प्रकल्प प्रमुख तथा संचालक, विस्तार संचालक, माफसू, नागपूर यांनी पशुसखींना संबोधित करतांना म्हटले की, शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून उत्पादकता वाढविणे आणि कुटुंबाची सामाजिक-आर्थिक उन्नती साधने महिला सक्षमीकरणातून शक्य असल्याचे म्हटले. माविम तर्फे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्हा समन्वय अधिकारी एस. बी. चिंचोलीकर यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. समारोप कार्यक्रमास परभणी येथून दूरस्थ प्रणालीद्वारे प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख मार्गदर्शन करतांना म्हटले की पशूधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत जनसामान्यात असलेली अनिश्चित्तता कमी करण्यासाठी पशुसखीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचे आपल्या मार्गदर्शनात म्हटले.
माफसू, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘महाराष्ट्रातील शेळी व कुक्कुटपालन करणा-या महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी पशुसखी व प्रशिक्षक महिलांचा क्षमता विकास’ या प्रकल्पाअंतर्गत दि.२६ फेब्रुवारी ते ०६ मार्च २०२४ दरम्यान पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे पशुसखीसाठी ‘शेळीपालन’ या विषयावर दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रकल्प सह-समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेन्द्र खोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात महाविद्यालयात राबविलेल्या लातूर, धारशिव, नांदेड आणि बीड जिल्ह्यातील एकूण ११९ पशुसखीच्या चार प्रशिक्षणाबाबत आढावा मांडला.
प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. शरद आव्हाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तर डॉ. राम कुलकर्णी यांनी प्रशिक्षण आयोजनात व्याख्यात्यांचे तसेच थेट वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार प्रकट केले. रेखा वेडे, ताई सिरसाट, कालिंदा अलगुडे, राणी कोरडे, आणि वैष्णवी नाईकनवरे या पशुसखीनी मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणादरम्यान त्यांना आलेले अनुभव व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अय्यान पाटील, संकेत नरवाडे, श्याम सावंडकर आणि अक्षय चिलमे या पदव्युत्तर विद्यार्थ्यानी प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका साकारली.