महात्मा बसवेश्वर कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील नऊ कुस्तीपटूंची स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
लातूर (प्रतिनिधी) : महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील नऊ कुस्तीपटूंची स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही निवड चाचणी महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात संपन्न झाली. या विजेत्या कुस्तीपटूंचा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नल्ला भास्कररेड्डी, अण्णासाहेब मुळे, विष्णू भोसले, प्रा. आशीष क्षीरसागर आणि विष्णू तातपुरे यांची उपस्थित होती. या विजेत्या कुस्तीपटूंमध्ये बाळासाहेब जमादार, आकाश गड्डे, महेश तातपुरे, ज्ञानेश्वर महानवर, विष्णू तातपुरे, भरत कराड, तुकाराम महानवर, प्रदीप गोरे, विनायक चन्नागिरे या खेळाडूंचा सहभाग आहे.
स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन दि. ०८ ते १२ मार्च २०२४ या कालावधीमध्ये तालुका क्रीडा संकुल, उदगीर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी मल्लाची नऊ मार्च रोजी शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असून यामध्ये स्व. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत जाधव उपस्थित राहणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ०९ मार्च रोजी सायं. सहा वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यातील ३६० कुस्तीपटू, मार्गदर्शक, तांत्रिक समिती सदस्य, पंच, सामनाधिकारी, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी तसेच स्वयंसेवक ०८ मार्चपासून या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व कुस्तीपटूंचे श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कार्यालय प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा समितीतील सदस्य आणि सर्व खेळाडूंनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.