पालकांनी मुलांना कौतुकाची थाप द्यावी – प्रा. डॉ. गौरव जेवळीकर
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य हे तलवारीच्या पातीवर नव्हे तर कौतुकाच्या थापीवर निर्माण केले होते. त्यामुळे प्रत्येक पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा, त्यांना संधी द्यावी व मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी, असे मत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी व्यक्त केले. ते वाढवणा येथील स्वप्नपूर्ती मॅथ्स अकॅडमीच्या वतीने आयोजित पालक मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी व्यंकटराव मुंडकर, ईस्माइल धावडे व स्वप्नपूर्ती मॅथ्स अकॅडमीचे संचालक नंदकिशोर पाटील यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. जेवळीकर म्हणाले, मातीच्या निर्जीव गोळ्याला आकार देता येत असेल तर सजीव माणसाला तर आकार देता आलाच पाहिजे. पालकांनी मूर्तिकाराप्रमाणे पाल्यामधील अनावश्यक दुर्गुण दूर करून एक आदर्श विद्यार्थी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. पाल्याबरोबर सातत्यपूर्ण होणारा सुसंवाद हा पाल्याच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘स्वप्नपूर्ती मॅथ्स अकॅडमी’च्या माध्यमातून यश संपादित करावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा कांबळे यांनी तर प्रास्ताविक व आभार अकॅडमीचे संचालक नंदकिशोर पाटील यांनी मानले.