महिला कर्मचाऱ्यांचा जागतिक महिला दिनानिमित्त झाला सन्मान !
जागतिक महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम
महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘पुस्तिकांची भिशी’ उपक्रम
लातूर (प्रतिनिधी) : उन्हाळा असो की पावसाळा प्रत्यक्ष फिल्डवर जावून, विविध आव्हानांचा सामना करीत आपली सेवा बजाविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात स्वच्छता कामगार ते कोतवाल, आशा सेविका अशा विविध पदांवर काम करणाऱ्या महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
शासकीय सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आपली शासकीय कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी पार पडताना अनेकदा संघर्षमय परिस्थितीला सामोरे जावे लागते. तसेच या धावपळीत त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी आणि त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांचे कौतुक करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध शासकीय विभागांतर्गत फिल्डवर काम करणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्रा. अंजली जोशी टेंभूर्णीकर, कस्तुरी सोमय मुंडे, आहारतज्ज्ञ डॉ. सुवर्णा बिराजदार, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा कोषागार अधिकारी उज्ज्वला पाटील, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण अधिकारी मनीषा बोरूळकर यांच्यासह प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त रामदास कोकरे यांची यावेळी उपस्थिती होती.
प्रत्येक महिला ही समाजातील महत्वाची घटक आहे. शासकीय कार्यालयात अधिकारी अथवा कर्मचारी आणि कुटुंबात आई, बहिण, पत्नी, मुलगी अशी जबाबदारी पार पाडणारी महिला स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते. आपले स्वतःचे व्यक्तिमत्व जपणे तिला जमत नाही. महिलांनी आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व जपायला हवे. आपल्या आरोग्याकडे, आवडी आणि छंद जोपासण्याकडे लक्ष द्यायला हवे. कार्यालयीन काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना वेळेचे योग्य नियोजन करून स्वतःसाठी काही वेळ काढायला हवा, असे मत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केले. तसेच आयुष्यात प्रत्येक महिलेने स्वतःचे अस्तित्व जपताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. आपली भूमिका स्पस्थ ठेवून वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.
कुस्तुरी सोमय मुंडे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देवून एकमेकींना मदत करीत प्रगती साधण्याचे आवाहन केले. प्रा. अंजली जोशी टेंभूर्णीकर यांनी यावेळी महिलांना ‘पुस्तिकांची भिशी’ संकल्पना समजावून सांगितली. तसेच डॉ. सुवर्णा बिराजदार यांनी आहार, मानसिक तणावाचे व्यवस्थापन आणि जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी केले. महसूल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा कोषागार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर शासकीय विभागातील महिला कर्मचारी यावेळी उपस्थित होत्या.
विविध विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
लातूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगार, पोलीस कॉन्स्टेबल, एस.टी. महामंडळातील वाहक, ग्रामसेविका, कृषि सहायक, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील, भूमी अभिलेख विभागात मोजणीदार, आशा, अंगणवाडी सेविका आदी प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करणाऱ्या प्रत्येक पदावरील पाच महिलांचा यावेळी भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.
महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘पुस्तिकांची भिशी’
महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तक वाचनाची आवड जोपासावी, यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘पुस्तिकांची भिशी’ उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आला. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी रोज थोडा तरी वेळ पुस्तक वाचनासाठी द्यावा, त्या पुस्तकाविषयी आपले समीक्षण मांडावे, हा उद्देश आहे. प्रत्येक महिला कर्मचाऱ्याने आपल्याकडील पुस्तके भिशीत जमा करावीत, तसेच भिशीतून नवनवीन पुस्तके प्राप्त करून त्याचे वाचन करावे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.