शिक्षणातून संस्कारांची पेरणी व्हावी – राजेसाहेब कदम
उदगीर (एल.पी.उगीले) : विद्यार्थी जीवनात पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कार महत्वपूर्ण असतात. जाती-धर्माच्या भिंती तोडून माणुसकीची इमारत उभारण्यासाठी बाह्य अलंकारापेक्षा संस्कार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळे शिक्षणातून संस्कारांची पेरणी व्हावी, असे मत सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन उदयोत्सव 2024 च्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड. एस. टी. पाटील व डॉ. आर. एन. लखोटिया, सदस्य बसवराज पाटील मलकापूरकर, शिवराज वल्लापुरे, प्रशांत पेन्सलवार, ललिता पाटील, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य प्रा. एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. जे. आर. कांदे, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रभारी प्रा. डॉ. एस. एन. लांडगे, प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी, प्रा. डॉ. अर्चना मोरे, श्रीगण रेड्डी, परमेश्वर वाकुडे, विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार स्वामी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राजेसाहेब कदम म्हणाले, कवीला मनाची भाषा कळते. कविता प्रश्न निर्माण करते, त्याचबरोबर कविता ठरवून लिहिता येत नाही. सामाजिक विसंगतीतून कविता जन्म घेते. प्रत्येक विद्यार्थ्याने कवितेचा आशय समजून घ्यावा व त्यातून नवनिर्मिती कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करावा, असे मत मांडले. त्यांनी आपल्या विविध कवितांच्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप करताना मल्लिकार्जुन मानकरी म्हणाले, संस्काराशिवाय माणसाची प्रगती, समृद्धी व विकास होऊ शकत नाही. वार्षिक स्नेहसंमेलनातून कला गुण प्रदर्शित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते. त्यामुळे संस्कार करण्यासाठीच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी तर पाहुण्यांचा परिचय स्नेहा नामवाड या विद्यार्थिनीने करून दिला. स्वागतगीत आरती वाकोडे या विद्यार्थिनीने गायले. सूत्रसंचालन शुभम मोतीपवळे व वैष्णवी आचार्य यांनी तर आभार हेमलता गायकवाड हिने मानले.