लातूरच्या पैलवानांनी गाजविले उदगीरचे कुस्ती मैदान : तीन पदके पटकावली
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हयातील उदगीर येथे स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यजमान असलेल्या लातूरच्या पैलवनांनी पहिल्याच दिवशी पार पडलेल्या स्पर्धेत मैदान गाजवून तीन पदके मिळविली आहेत. लातूरकरांनी गाजवलेल्या वर्चस्वामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
उदगीर येथे होत असलेल्या स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत लातूरच्या यजमान संघानेही सहभाग नोंदवला आहे. या संघातील ग्रीक रोमन गटातील 10 , फ्री स्टाईल गटातील 10 व मुलींच्या संघातील 9 कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन पैलवानांनी तीन पदके मिळविली आहेत. यात 57 किलो वजन गटात फ्री स्टाईल मध्ये लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आकाश गट्टे या पैलवानाने दुसरे मेडल मिळविले आहे. 77 किलो वजन गटातील ग्रीकोरोमन मध्ये आष्टा ता. चाकूर येथील विष्णू तातनुरे याने तिसरे मेडल मिळविले आहे, तर 130 वजन गटात टाका मासुरडी ता. औसा येथील अक्षय शेळके याने तिसरे मेडल मिळविले आहे.
लातुर जिल्ह्याला कुस्तीचा समृद्ध वारसा मिळाला आहे. यात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगडच्या रुस्तम ए हिंद केसरी स्व.पै. हरिश्चंद्र बिरादार यांनी तर कुस्तीला राजमान्यता मिळवून दिली. याशिवाय अर्जुन पुरस्कार प्राप्त साई ता. औसा येथील काकासाहेब पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, छत्रपती पुरस्कार प्राप्त शरद पवार, ज्ञानेश्वर गोथडे रामलिंग मुदगड, उपमहाराष्ट्र केसरी सागर बिरादार, शैलेश शेळके, आंतरराष्ट्रीय पैलवान विश्वनाथ पाटील भुसनी ता. औसा, शिवशंकर बावले औसा यांच्या सह अनेकांनी कुस्तीच्या खेळात लातूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. शिवाय स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यापूर्वी शैलेश शेळके , शिवशंकर बावले, विष्णू तातपुरे, शरद पवार यांनी पदके मिळविली असल्याची माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव शिवरुद्र पाटील यांनी दिली.
लातुर येथील क्रीडा संकुलात खेलो इंडिया कुस्ती केंद्र असल्याने व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेतल्यामुळे लातूर ने हे यश संपादन केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुस्तीच्या मॅट दिल्याने व शासनाकडून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिले जात असल्यामुळे जिल्ह्यात अनेक मल्ल निर्माण होत असल्याचे ही जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे म्हणाले.