लोककलेला प्रामाणिकपणे जोपासा – लोककलावंत प्रमिला लोदगेकर
उदगीर (एल.पी.उगीले): प्रतिकूल परिस्थितीवर मात करतच यशाचे शिखर गाठता येते. त्यामुळे गरिबी परिस्थितीविषयी नकारात्मकता बाळगण्यापेक्षा आपण कलेवर प्रेम केले पाहिजे. कला कोणतीही असो ती प्रामाणिकपणे जोपासा, असे मत उस्ताद बिस्मिल्ला खान राष्ट्रीय युवा पारितोषक विजेत्या लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांनी व्यक्त केले. त्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उदयोत्सव – 2024 च्या समारोप समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, सहसचिव ॲड.एस.टी.पाटील, डॉ.आर.एन.लखोटिया, सदस्य बसवराज पाटील मलकापूरकर, शिवराज वल्लापुरे, मन्मथ बिरादार, प्रशांत पेन्सलवार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने, महाविद्यालय विकास समिती सदस्य पंडित सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.मस्के, उपप्राचार्य एस.जी.कोडचे, प्रा.जे.आर.कांदे, प्रा.एस.व्ही.मुडपे, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रभारी डॉ. सुरेश लांडगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना लोदगेकर म्हणाल्या, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्चविद्या विभूषित होण्याचे स्वप्न बाळगा. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यायाने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. तो आपण सर्वांनी जोपासावा, असे आवाहन उपस्थितांना केले. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करावी. आई-वडील व गुरुजनांना सार्थ अभिमान वाटेल असे कर्तृत्व साध्य करावे. सुप्रसिद्ध निवेदिका प्रा.शोभा कुलकर्णी म्हणाल्या, स्नेहसंमेलनातून कलाकार घडत असतात. मराठवाड्याची माती कर्तुत्वासाठी नेहमीच प्रेरक राहिली आहे, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असावा. अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र तिरुके म्हणाले, समाजाने लावणीकडे, लोककलावंता कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, प्रत्येक कला ही सांस्कृतिक कलात्मकतेमध्ये भरच टाकत असते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून आपले स्वप्न साकार करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. मस्के यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नामवाड व सुष्मिता बोरगावकर यांनी तर आभार विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्राध्यापक डॉ.सुरेश लांडगे यांनी मानले.