वृक्षतोडीला आळा घाला, संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी समता परिषदेचे उपोषण
उदगीर (एल पी उगीले) : उदगीर उपविभागातील होत असलेल्या प्रचंड वृक्षतोडीचा निषेध नोंदवून, परिक्षेत्र अधिकारी ए. आर. सांगुळे त्यांच्या गैरकारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य कारवाई करावी. या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने बालाजी माधवराव फुले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
आपल्या मागण्याचे निवेदन सादर करताना त्यांनी नमूद केले आहे की, लातूर जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने एका बाजूला वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याची भाषा केली जाते, मात्र प्रत्यक्षात वन अधिकार्याच्या दुर्लक्षाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास १०७ सॉ मिलचे अनधिकृत पणे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच कित्येक मिल विनापरवाना बिनधास्तपणे चालू आहेत. त्याकडेही संबंधित अधिकाऱ्याचा कानाडोळा आहे. यामुळे परिसरात बेसुमार वृक्षतोड होत असून या गोष्टीकडे कानाडोळा केला जात आहे, ही बाब शाश्वत विकासासाठी अत्यंत धोकादायक आहे. भावी पिढीसाठी आणि एकूण समाजासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड ही धोक्याची घंटा आहे. मध्यंतरीच्या काळात शहरात देखील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर काही प्रमाणात त्याला आळा बसला. मात्र ग्रामीण भागात अजूनही बिन बोभाटपणे मोठमोठी वृक्ष तोडली जात आहेत, आणि ती अनाधिकृत मिलवर विकली जात आहेत. या गोष्टीचे गांभीर्य वरिष्ठांनी तात्काळ विचारात घेणे गरजेचे आहे. वृक्षतोडीला आळा घालण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ते जर कर्तव्यात कसूर करत असतील तर अशा अधिकाऱ्यावर योग्य कारवाई केली जावी, अशी ही मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नेते बालाजी माधवराव फुले यांनी केली आहे.