दिव्यांगाच्या निधीचे क्रीडा मंत्र्याच्या हस्ते धनादेश वाटप
उदगीर (एल पी उगिले) : उदगीर तालुक्यातील शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या असलेल्या मलकापूर ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामनिधीच्या पाच टक्के रक्कम अपंग व दिव्यांगाना तसेच महिला व बालकल्याण अंतर्गत लाभधारकांना निधीचे धनादेश उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच गुरुनाथ अण्णा बिरादार हे होते, तर व्यासपीठावर उपसरपंच महबूब भाई शेख, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तहसीलदार राम बोरगावकर, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, कार्याध्यक्ष वसंत पाटील, फैजू खां पठाण, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बोडके, महेश तोडकर, गंगाधर पवार, सतीश पाटील, राजेंद्र भालेराव, आशाबी शेख, अतिक शेख, मुकेश भालेराव इत्यादी उपस्थित होते..
याप्रसंगी बोलताना ना संजय बनसोडे म्हणाले की, मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून नवीन वसाहत अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न आता कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच मलकापूरच्या लगत जाणारा रिंग रोड चार पदरी होणार असल्याने मलकापूर हे शहराचाच भाग बनणार आहे. मलकापूर ग्रामपंचायतचे सरपंच व त्यांचे सहकारी तसेच ग्राम विस्तार अधिकारी पाटील यांना विकास करण्याचा चौफेर अभ्यास असल्याचे सांगून ग्रामपंचायतीच्या विकास कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी अमोल निडवदे यांनी स्पष्ट केले की, ग्रामपंचायत मार्फत स्व निधीतून दिव्यांगाना आर्थिक मदत देणारी आणि दिव्यांगा बद्दल सहानुभूती दाखवणारी, विकास कार्य करणारी एक उल्लेखनीय ग्रामपंचायत म्हणून मलकापूरची ओळख असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बोडके यांनी केले, तसेच गेल्या 14 महिन्याच्या कारकिर्दीत विविध योजनेतून केलेल्या विकास कामाचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव हलगरे यांनी तर आभार ग्रामसेवक संतोष पाटील यांनी मानले.