आदर्श आचारसंहितेसाठी महसूल प्रशासन सज्ज, प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण
उदगीर (एल.पी.उगीले) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी, ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे, त्यांच्या प्रशिक्षण पहिला टप्पा पूर्ण झाला असून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी त्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उदगीर विधानसभा मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक नियुक्त करण्यात आले असून निवडणुकीच्या संदर्भाने एफ एस टी, एस एस टी, व्ही एस टी, व्हि व्ही टी, खर्च पथक व निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यप्रणाली अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक इतर अन्य पथक गठीत करून अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या सर्व पथकांची पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक यापूर्वीच घेण्यात आली आहे. पुन्हा एकदा वेगवेगळ्या पथकातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी राम बोरगावकर यांच्या उपस्थितीत तसेच उदगीर ग्रामीण व उदगीर शहर पोलीस स्टेशन तसेच जळकोट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदर्श आचारसंहितेचे व आयोगाने दिलेल्या सूचना व मार्गदर्शनासनुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी सर्व नियुक्त कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. सदर आयोजित प्रशिक्षणामध्ये आदर्श आचार संहितेचे नियम व आयोगाच्या सूचना व प्रत्येक पथकाचे कार्य व त्यांची कार्यप्रणाली आणि त्यातील त्यांची जबाबदारी, याबाबत सदर प्रशिक्षणात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संबंधितांना सदर प्रशिक्षणामध्ये आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन व्हावे, यासाठी संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सदरील बैठकीनंतर आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पूर्व तयारी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व त्यांचे अधिनस्त कर्तव्यावर असलेले सर्व कर्मचारी व सहकारी यांच्याकडून पूर्वतयारी करून घेण्यात आली. एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन आचारसंहितेसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.