पुरवठा नायब तहसीलदार बेंबळगे यांच्यावर तात्काळ कारवाई करा – संजय राठोड यांची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : इ.स. 2010 आणि 2011 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुरवठा विभागाचे धिंडवडे काढत तहसील कार्यालय उदगीर यांच्या आशीर्वादाने उदगीर शहरातील राशन दुकानदार यांच्या माध्यमातून बोगस राशन कार्ड बनवून, राशनच्या धान्याचा मोठा काळाबाजार होत असून दर महिन्याला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. असे निदर्शनास आणून देऊन 31 डिसेंबर 2010 रोजी मनसे कार्यकर्त्यांनी तहसीलच्या मुख्य दारासमोर तीन तास तीव्र ठिय्या आंदोलन करून हा विषय ऐरणीवर आणला होता. या आंदोलनाचा परिपाक म्हणजे उदगीर शहरातील सर्वच्या सर्व म्हणजे 30 राशन दुकाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द केली होती, व 15 फेब्रुवारी 2011 रोजी या सर्व राशन दुकानावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत शहर पोलिस स्टेशन उदगीर येथे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
राशनच्या धान्याचा काळाबाजार संपवण्यासाठी व लाखो रुपयांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा विषय हाती घेऊन प्रशासनास कारवाई करण्यासाठी भाग पाडले, पण पुन्हा तशीच प्रशासनातील हुशार अधिकाऱ्यांनी या संधीचा फायदा घेत लोकांना राशन मिळण्यास त्रास होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील राशन दुकानदारांना ही 30 राशन दुकाने चालवण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून दिली गेली. पण या माध्यमातूनही नायब तहसीलदार पुरवठा विभाग बेबंळगे व ग्रामीण भागातील ही दुकाने जोडलेले राशन दुकानदार यांनी मिळून मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे निदर्शनास येत आहे. असा आरोपही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी केला आहे. तहसील प्रशासनाने ही दुकाने ग्रामीण भागातील राशन दुकानाच्या नावे लावून ती खाजगी लोकांना चालवण्यासाठी दिल्याचे लक्षात येत आहे, यासाठी त्यांनी या खाजगी लोकांकडून दर महिना या राशन दुकानदारांना व स्वतःला हप्ता ठरवून घेतलेला आहे. तसेच या दुकानाच्या माध्यमातून काळ्या बाजारात धान्याची पाठवण्याची यंत्रणा सुद्धा उभारून मोठा भ्रष्टाचार निर्माण केला आहे, असाही गंभीर स्वरूपाचा आरोप केला असून निपक्षपातीपणे गोरगरिबांसाठी आलेल्या स्वस्त धान्याचा होणारा काळाबाजार रोखला जावा अशी प्रमाणिक अपेक्षाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यक्त केली आहे.
त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यामध्ये राशन दुकानदाराचे दर महिना थम मशीन वर कोणाचे थम्ब घेतले जातात? राशन दुकानदाराच्या थम ऐवजी खाजगी लोकांच्या थमने या मशीनी कार्यान्वित केल्या जात आहेत. तसेच हे राशन दुकानदार राशन वाटपासाठी न बसता, खाजगी लोकांच्या माध्यमातून राशन वाटप करत आहेत.
एका एका राशन दुकानदाराच्या नावे पाच ते सहा दुकाने दिली गेलेली आहेत! ती कोणत्या राशन दुकानदाराला दिली गेलेली आहेत ? याची यादी तपासून या प्रकरणी चौकशी समिती नेमुन सखोल चौकशी करावी. तसेच दोषी नायब तहसीलदार यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या पर्यायी व्यवस्थेसाठी जोडलेल्या ग्रामीण भागातील राशन दुकानदाराचे परवाने तत्काळ रद्द करून त्यांच्यावर जीवनाश्यक वस्तू कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सावळ्या गोंधळाच्या विरोधात तीव्र आक्रमक आंदोलन हाती घेईल, याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर यांना देण्यात आले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, शहराध्यक्ष संतोष भोपळे,तालुका उपाध्यक्ष शेतकरी सेना अजय भंडे, धोंडीराम हिंगमिरे, मनविसे शहर सचिव रोहित बोईनवाड,कार्यालय प्रमुख भानुदास राजेकर, विनोद चव्हाण, ईश्वर चिद्रेवार, अनिकेत सुर्यवंशी, परमेश्वर बापटले इ.कार्यकर्ते उपस्थित होते.