आनंद जीवने यांची शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड
उदगीर (एल. पी. उगिले) : सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्व आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांची नुकतीच शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणी व मराठवाडा कार्यकारणी नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीला प्राधान्याने लातूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मराठवाड्याची संपूर्ण जबाबदारी आनंद जिवणे उर्फ पृथ्वीराज पाटील यांच्यावर सोपवण्यात आली असून विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच मराठवाडा संपर्कप्रमुख म्हणून महादेव कोठे यांचे नियुक्ती करण्यात आली, तर लातूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीमंतअण्णा लुले व योगेश तगरखेडे यांची निवड करण्यात आली. तसेच देवणी तालुका अध्यक्ष म्हणून दत्ता अर्जुने, तालुका संघटक म्हणून शंकर बावचे, कार्याध्यक्ष म्हणून बालाजी लासूने, जिल्हा सरचिटणीस म्हणून पप्पू सावंत, करीम भाई शेख यांची देवणी तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, मार्गदर्शक दगडू पडले यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे सूत्रसंचालन दत्तात्रय लोभे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीमंत लुले यांनी केले.