उष्माघात होऊ नये म्हणून काळजी घ्या – डॉ. शरद तेलगाने
उदगीर (एल पी उगीले) : सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वातावरणात अचानक बदल होत असून तापमान वाढलेले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची बाधा होण्याची मोठी शक्यता असते. वेळ प्रसंगी उष्माघातामुळे मृत्यू देखील होऊ शकतात. असे धोके टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे विचार प्रबोधनात्मक किर्तनकार तथा उदगीरच्या ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी व्यक्त केले आहेत.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना डॉ.शारडकुमार तेलगाने म्हणाले की, नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी शक्यतो दुपारच्या वेळी उन्हात फिरणे टाळावे. तसेच पांढऱ्या रंगाचे किंवा फिकट रंगाचे सैल कपडे घालावेत. बाहेर फिरावेच लागणार असेल तर डोक्याला रुमाल बांधावा, शक्य असेल तर डोळ्यावर गॉगल वापरावा. यामुळे डोके व डोळ्याची काळजी घेता येईल. उष्णतेमुळे शरीरातील पाणी पातळी कमी होत असते. त्यामुळे बाहेर जाताना पिण्याच्या पाण्याची बॉटल सोबत ठेवावी. तहान असो अगर नसो थोड्या थोड्या वेळाने सतत पाणी पीत राहावे. उन्हातानात काम करणारे शेतकरी, शेतमजूर यांनी आपली कामे सकाळ व संध्याकाळी करावीत. शक्यतो दुपारी काम करणे टाळावे. उन्हाळ्यात दिवसभर सतत पाणी पिणे अथवा द्रव पदार्थाचे नियमित सेवन करणे चांगले असते.
उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र स्वरूपाचा ताप येणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी जाणवणे, नाडीचे ठोके मंद होणे, अशक्तपणा आणि चक्कर आल्यासारखे वाटणे, उलटी होणे, हातापायाला गोळे येणे, पोटात अचानक दुखायला सुरुवात होणे, खूप घाम येणे अशा स्वरूपाचे काही प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर खूप घाम येत असेल तर रक्तातील द्रव पदार्थ कमी होतात, त्यामुळे रक्ताचे घट्टपण वाढल्याने महत्त्वाचे अवयव प्राधान्याने मेंदू, हृदय, किडनी यांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. परिणामतः हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असू शकते. हे गांभीर्य सर्व नागरिकांनी ओळखावे. विशेष करून ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा स्वरूपाची आजार आहेत , अशांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अशा रुग्णांनी दिवसभर नियमित पाणी पिणे, उन्हात न फिरणे त्याच बरोबर आरोग्यविषयक काही तक्रार असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आपल्या परिसरात उन्हाचे प्रमाण वाढल्यास घरातील हवा खेळती ठेवावी, शक्य असेल तर पंखे, कुलर यासारख्या साधनांचा वापर करावा. वयोवृद्ध आणि लहान मुलांना शक्यतो उन्हात जाऊ देऊ नका. उपचारापेक्षा काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आणि चांगले असते. याचे भान सर्व नागरिकांनी ठेवावे. असेही आवाहन डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी केले आहे.