बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये कॅम्पस मुलाखतीमध्ये 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नियुक्ती
अहमदपूर (गोविंद काळे) : एक्सेप्ट एच आर स्टेपिंग प्रा. ली. पुणे तसेच माय् व्हिलेज माय जॉब, शिरूर ताजबंद या कंपनी अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष गणेशदादा हाके यांच्या मार्गदर्शनानुसार कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस मुलाखतीसाठी महाविद्यालयातील सन 2022- 23 मध्ये पास झालेले व सन 2023 -24 मध्ये शेवटच्या वर्षात पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी माय व्हिलेज माय जॉब चे डायरेक्टर सतीश कारभारी व एच.आर. कुमारी आकांक्षा पवार ही सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये उपस्थित राहून मुलाखती पार पडल्या.
या मुलाखतीमध्ये बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जवळपास 200 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच वीस विद्यार्थ्यांना लगेच नियुक्तीपत्र देण्यात आले. निवड झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
नियुक्तीपत्र देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी हे माय् व्हिलेज माय जॉब शिरूर ताजबंद येथे तर 16 विद्यार्थी हे एक्सेप्ट एच आर स्टेपिंग प्रा. ली. पुणे येथे पाठवण्यात येणार आहेत.
यावेळी प्राचार्य स्वप्निल नागरगोजे यांनी बोलताना विद्यार्थ्यांना आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आपल्याच भागात काम करण्याची संधी मिळत आहे याचा मला आनंद होत आहे त्यामुळे यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन केले.
कॅम्पस मुलाखती यशस्वीतेसाठी आय टी आय चे प्राचार्य मदन आरदवाड, संतोष लातूरे, कालिदास पिटाळे,संग्राम कोपनर, समीर खुरेशी, रूपा पाटील, आरती पुणे, अपेक्षा सोनोने, विजय कुलकर्णी,सतीश केंद्रे,कैलास होनमाने, भरत दुधाटे आदींनी परिश्रम घेतले.