लोखंडी कत्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या, जबरी चोरी व वाहनाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला अटक
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात नव्यानेच कोयता गॅंग सुरू झाल्याची चर्चा होती. काही समाजकंटक लोखंडी कत्तीचा भाग दाखवून खंडणी वसूल करणे, जबरी चोरी करणे, दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड करणे असे कृत्य करत होते. त्या आरोपीला लातूर पोलिसांनी अटक करून चांगलाच धडा शिकवला आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 15 मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सोनाई पेट्रोलपंपा जवळील परिसरात दोन इसम हातात लोखंडी कत्ती घेऊन रस्त्याने जाणारे येणारे लोकांना धमकावून गाड्यांची तोडफोड करून रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाचे मोबाईल जबरीने हिसकावून घेतल्याचे तसेच भाजी विक्रेत्यांना लोखंडी कत्तीचा धाक दाखवून खंडणी वसूल करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस ठाणे एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी अमलदारांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेथे अज्ञात इसमानी नमूद परिसरात लोखंडी कत्तीचा धाक दाखवून एका इसमाचे दोन मोबाईल हिसकावून घेतले असून रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चे काच फोडून परिसरात दहशत निर्माण केली होती. तसेच रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे “धंदा करायचा असल्यास 500 रुपये द्यावे लागतील.” असे म्हणून भाजी विक्रेत्याकडून खंडणी घेतल्याचे व पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपी त्यांच्याकडील मोटार सायकल वरून पळून गेल्याचे समजले. त्यावरून पोलीस पथकांनी परिसरातील लोकांकडे विचारपूस करून त्यांचे वर्णन, चेहरेपट्टीची माहिती करून घेऊन दोन अज्ञात इसमांचा लातूर शहरातील विविध भागात शोध घेतला असता, नमूद घटनेतील एक आरोपी मध्यवर्ती बस स्थानक येथे लपून बसलेला असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. पोलीस पथकाने 16/03/2024 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नमूद घटनेतील इसम नामे तोहीद अकबर पठाण, (वय 21 वर्ष, राहणार वीर हनुमंतवाडी तालुका जिल्हा लातूर).यास त्याने चोरलेल्या दोन मोबाईल व घटनेत वापरलेल्या मोटारसायकल व लोखंडी कत्ती सह ताब्यात घेतले.
तोहीद अकबर पठाण याने त्याचा आणखीन एक साथीदार वैभव उर्फ मोन्या शिवराज बनसोडे, (राहणार पटेल नगर, लातूर).याच्यासह मिळून हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करून, भाजी विक्रेत्याकडून खंडणी वसूल केल्याची तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची काच फोडून, एका क्रियेटा कार चे नुकसान केल्याचे व एका इसमाकडील दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे सांगितले. त्यावरून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा क्रमांक 184/2024 कलम 392, 384 ,327, 34 भादवी सह कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने नमूद आरोपीला 19/03/ 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर, गांधी चौक, एमआयडीसी व विवेकानंद चौक येथे जबरी चोरी, मारामारी, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत असताना दुखापत करणे अशा प्रकारचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी वैभव उर्फ मोन्या शिवराज बनसोडे यांचा शोध सुरू असून लवकरच त्याला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, राष्ट्रपाल लोखंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरज जगताप, पोलीस अमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, भोसले, प्रशांत ओगले, योगेश चिंचोलीकर, तुरे यांनी केली आहे.