आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर (एल.पी.उगीले) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या सर्व शासकीय विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, संगीता टकले, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
आदर्श आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करू नये ?, याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुस्पष्ट निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांप्रमाणे सर्व शासकीय विभागांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून 24 तास, 48 तास आणि 72 तासांमध्ये आवश्यक कार्यवाहीची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाकडे पाठवावा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक विषयक कामकाज हे प्राधान्याने आणि अचूकपणे होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच या काळात सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी समन्वयाने आणि काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त मनोहरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी आदर्श आचारसंहिता विषयी मार्गदर्शन केले.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून त्यांना आदर्श आचारसंहिता विषयक माहिती दिली. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.