मौजे भाकसखेडा व परिसरात मतदान जनजागृती
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील मौजे भाकसखेडा व परिसरात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने भाकसखेडा (प), चिघळी, भाकसखेडा पूर्व, गंगापूर व परिसरात प्रशासनाच्या वतीने मतदारांना मतदान करण्याच्या संदर्भात प्रबोधन करून मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले.
लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असून प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे सज्जाचे तलाठी अंकुश वडगावे यांनी सांगितले. यावेळी सरपंच अर्चना खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे, ग्रामसेवक नरेंद्र पांचाळ, गावातील नागरिक उपस्थित होते. गावातील दिव्यांग व्यक्ती व 85 वर्षाच्या पुढे वय असलेल्या व्यक्तींना घरीच बॅलेट पेपर दिला जाणार असून पोस्टल मतदानाच्या पद्धतीनुसार त्यांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे, अशी शासनाची भूमिका असून यासंदर्भात प्रशासनाने जनजागृती केली.