लातूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिमण्यांसाठी खाद्य, पाण्याची सुविधा
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्हाधिकारी कार्यालयात चिमण्यांसाठी खाद्य आणि पाण्याची सुविधा करण्यात आली असून, यासाठी झाडांवर बांधण्यात आलेल्या कुंड्यांमध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पाणी व खाद्य टाकून या उपक्रमाला प्रारंभ झाला. जागतिक चिमणी दिनानिमित्त वन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, वन परिमंडल अधिकारी निलेश बिराजदार, वनरक्षक महेश पवार, बालाजी पाटील, श्री. भालेराव , बालाजी कांबळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कमर्चारी यावेळी उपस्थित होते.
चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून 20 मार्च या जागतिक चिमणी दिनी याबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाडांवर चिमण्यांसाठी खाद्य आणि पाण्याच्या कुंड्या बांधण्यात आल्या. प्रत्येक नागरिकाने चिमण्यांसाठी आपल्या घराच्या गॅलरीमध्ये खाद्य, पाण्याच्या कुंड्या ठेवाव्यात. तसेच चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.