आगार प्रमुख, वाहतूक नियंत्रकाच्या कामचुकारपणामुळे बससेवा कोलमडली
शाहूवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील मलकापूर एसटी महामंडळाने भोंगळ कारभाराचा कळस गाठला असून ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मलकापूर एसटी आगाराची कोलमडलेली बससेवा येत्या पंधरवड्यापर्यंत मार्गी लावावी आणि शेकडो विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांना तहसील कार्यालयात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केली. तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शेकापच्या कार्यकर्त्यांनी संयमी भूमिका घेतली. पंधरा दिवसांत आगार प्रमुखांनी मनमानी कारभार थांबवावा, आणि कामात सुधारणा करण्यासाठीचे तोंडी आदेश तहसीलदार चव्हाण यांनी दिले.
मलकापूर आगारातून सुटणाऱ्या एसटी बस वेळेत सुटत नाहीत. एसटीची सेवा सुरळीत नसल्याच्या तक्रारी प्रवासी वर्गातून सतत येऊ लागल्या आहेत. कोल्हापूर मार्गासह अन्य मार्गावरील एसटी सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. भंगार गाड्यांममुळे अपघातात वाढ झाली आहे, बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. याबाबत जाब विचारला असता प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात, असे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना बैठकीच्या दरम्यान शिष्टमंडळाने सांगितले. यावेळी भाई भारत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, राजाराम मगदूम, प्रा. शिवाप्पा पाटील, बापूराव कुंभार, दस्तगीर आत्तर, तुकाराम पाटील, सुरेश म्हाऊटकर, सुदाम कांबळे, दशरथ नांगरे, मुकुंद पाटील सोनवडेकर आदी उपस्थित होते.