शिक्षणातून मिळणारे ज्ञान सामाजिक जीवनासाठी उपयोगात आणावे – प्राचार्य डॉ वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षण हे नोकरी मिळविण्यासाठीच महत्वाचे नसते तर शिक्षणातून मिळणारे ज्ञान हे चांगले सामाजिक जीवन जगण्यासाठी उपयोगात आणून तुम्ही जे काही करताहेत ते समाजमान्य झाले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ शैक्षणिक विचारवंत, समीक्षक तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे डॉ. मारोती कसाब, डॉ. सतीश ससाणे, डॉ. डी. एन. माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, शिक्षणातून समाजाला मान्य असलेल्या बाबी आपल्या हातून घडाव्यात याकरिता आपल्या महाविद्यालयातून शिक्षणातून संस्कार केले जातात आणि ते संस्कार देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी उपयोगात आणले पाहिजेत. तसेच आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाबरोबरच योग्य नियोजन ही महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी बी.ए. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पेन व चॉकलेट तसेच महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचा वार्षिक अंक भेट देऊन निरोप दिला. तर बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कायम स्मरणात राहतील अशा भेटवस्तू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना देऊन सन्मानित केले. यावेळी कु.वैष्णवी नागरगोजे, रोहन सावंत, भागवत भोसले, दिव्या गुळवे या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तसेच ज्ञानेश्वर जाधव , शालू जाधव, सत्यशीला स्वामी , शेख नगमा , वैष्णवी मुंढे या बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच प्राध्यापकांच्या वतीने डॉ. डी. एन. माने यांनी आपल्या मनोगतातून गुरु-शिष्यांचे महत्त्व सांगितले. तर डॉ. सतीश ससाणे यांनी म्हटले की, महात्मा फुले महाविद्यालय संस्काराचे केंद्र आहे. या महाविद्यालयातूनया महाविद्यालयातून आदर्श नागरिक घडविले जातात. तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी परीक्षे संबंधी मार्गदर्शन केले व इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करून आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. ज्योत्स्ना मचकंटे हिने केले तर सूत्रसंचालन कु. वैष्णवी स्वामी ने व आभार वेदांत जोशी ने मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.