विकसित भारत निर्माण साठी महायुतीला मतदान करा – बावनकुळेउदगीरात एकच चर्चा, सभेतील रिकाम्या खुर्च्या !!
उदगीर (एल. पी. उगिले) : विकसित भारत निर्माण साठी भारतीय जनता पार्टी, महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या प्रचार सभेत केले. याच सभेमध्ये नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचे स्वागत आणि सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, लोकसभेचे उमेदवार विद्यमान खा. सुधाकर शृंगारे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. सुधाकर भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उत्तरा कलबुर्गे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना राजेश्वर नीटुरे म्हणाले की, या सभेला वेळ मिळाला नसल्यामुळे लोक कमी असले तरी पुन्हा वेळ द्या, यापेक्षा चार पट मोठी सभा घेऊन दाखवतो.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला उशीर झाल्यामुळे महिलावर्ग उठून गेला, त्या महिलांची मी दिलगिरी व्यक्त करतो, या शब्दात माफी मागितली. मात्र यावेळी सभेसाठी लावलेल्या खुर्च्या मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहिल्याने शहरात रिकाम्या खुर्च्यांची चर्चा होत होती. ना. संजय बनसोडे यांनी आपल्या सोबत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, रासप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह अकरा मोठे पक्ष सोबत असल्यामुळे महायुतीचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र सभेला अकराशे देखील लोक उपस्थित नसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सभेमुळे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार होण्यापेक्षा अपप्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
क्षणचित्रे…….
रिकाम्या खुर्च्या….
सभेसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहिल्याने संयोजक आणि सभेसाठी आलेल्या नेतेमंडळीमध्ये कुजबूज सुरू होती. इतर वेळा साध्या बैठकीसाठी देखील जास्त लोक उपस्थित असतात, मात्र यावेळी मोठ्या सभेसाठी देखील लोकांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
देशमुख परिवारावर टीकेची झोड….
नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले राजेश्वर नीटुरे यांनी काका पुतण्या यांची प्रायव्हेट कंपनी म्हणजे काँग्रेस बनत चालली आहे, देशमुख परिवाराकडून कार्यकर्त्यांना कसलाही न्याय दिला जात नाही. आपण आणि आपला परिवार यालाच प्राधान्य दिले जाते. जर सगळी पदे तुमच्या घरातच पाहिजे असतील तर कार्यकर्त्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला.
सभेला उशीर, बावनकुळे यांची दिलगिरी
नियोजित सभा सहा वाजता सुरू होण्यापेक्षा होते मात्र सभेला खूप उशीर झाल्याने सभामंडप मोठ्या प्रमाणात रिकामा दिसत होता ते पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सभेसाठी उपस्थित राहावे म्हणून आलेल्या परंतु उशीर झाल्यामुळे निघून गेलेल्या महिला आणि इतर कार्यकर्त्यांची माफी मागितली.
लिंगायत समाजाचा विशेष करून उल्लेख…..
यापूर्वी जेव्हा ना संजय बनसोडे आणि लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे उदगीर दौऱ्यावर आले असता वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापूर यांनी स्पष्टपणे खासदार म्हणून तुम्ही लिंगायत समाजासाठी काय केलात? असा खडा सवाल सुधाकर शृंगारे यांना केला होता. तसेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या बाजूने लिंगायत समाज झुकत चालल्याने होत असलेली चर्चा चुकीची असून लिंगायत समाज आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात राहील असा विश्वास राजेश्वर निटरे यांनी व्यक्त केला.