आदर्श कुटुंबाच्या उभारणीसाठी संशय नको विश्वास असावा – भागवताचार्य ह.भ.प प्रशांत महाराज खानापूरकर.
उदगीर (एल. पी.उगीले):- आदर्श कुटुंब घडवण्यासाठी संशय सोडून विश्वास ठेवू तरच घरचे अणि समाजाचे सौख्य कायम राहते.असे प्रतिपादन प्रशांत महाराज खानापूरकर यांनी
डोंगरशेळकी ता. उदगीर येथे श्री समर्थ धोंडूतात्या महाराज यांच्या 92 व्या पुण्यतिथीनिमित्त भागवत कथेत मार्गदर्शन करताना सांगितले . ह.भ.प. प्रशांत महाराज खानापूरकर यांनी आपल्या अमृतवाणीतून धर्म शास्त्रातील अनेक प्रमाणाचा आधार घेत जमलेल्या भाविकांना उपदेशाचे डोस पाजले.ते म्हणाले, ” जिथे भक्तीचा सन्मान होतो,तिथेच भक्ती वास करते. ” ज्ञान व वैराग्य ही भक्तीची दोन मुले आहेत.ज्ञानाला वैराग्याची साथ मिळाली तर मोक्ष प्राप्तीचा मार्ग अधिक सुकर होतो. माणसाने आपले दुःख इतरांना सांगू नये,कारण लोक आपले दुःख रडून ऐकतात.व तेच दुःख इतरांना हसून सांगतात.म्हणून आपले दुःख फक्त देवाला सांगा.त्यावर तुमची भक्ती असेल तर देवच त्याचे निराकरण करतो.पुढे महाराज म्हणतात, कुटुंबाच्या उभारणीत आईची भूमिका खूप महत्त्वाची असते.आपल्या मुलाचे अपराध पोटात घालून घेऊ नका,वेळीच त्याला समज द्या. महाराजांनी मानवी प्रवृत्तीच्या संशयावर बोट ठेवत शास्त्रातील गोकर्ण व धुंदली यांची कथा मार्मिकपणे विषद केली.अती संशय माणसाला विनाशाकडे नेतो.तेव्हा शांत व संयमी जीवन जगण्याचा मोलाचा सल्ला महाराजांनी जमलेल्या भक्तगणांना दिला. एकंदरीत भागवत कथेच्या पाच अध्यायात माणसाच्या
वर्तनावर मोलाचे मार्गदर्शन केले.
ही कथा ऐकण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.