प्रा. पांडुरंग फड यांना वॉशिंग्टन (अमेरिका) विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्रदान
उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या 14 वर्षापासून लोणी येथे श्रेया कोचिंग क्लासेस व उदगीर येथे समर्पण करिअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रा. पांडुरंग फड यांना 6 एप्रिल रोजी गोवा येथे भव्य अशा दीक्षांत समारंभात वॉशिंग्टन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगांबर कामत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
त्यांचे मामा कै. व्यंकटराव इप्पर व लोणी गावचे माजी सरपंच कै. ज्ञानोबा फड यांचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये शिक्षण मिळावे या उद्देशाने 2010 मध्ये त्यांनी श्रेया कोचिंग क्लासेसची सुरुवात केली होती, आज त्याचे वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी म्हणून आपल्या क्लासेसच्या माध्यमातून ते दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात, तसेच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करतात. पालकांशी संवाद साधण्यासाठी पालक संवाद मेळाव्याचे आयोजन करतात. तसेच महिला पालकांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करतात. या कार्यक्रमाला लोणी गावातील व परिसरातील 700 ते 800 महिला उपस्थित राहतात. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे ते आयोजन करतात. दरवर्षी त्यांचे 50% पेक्ष्या जास्त विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होतात, इंग्रजी विषयात 90 पेक्षा जास्त गुण घेणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते. समाज माध्यमाने त्यांच्या कामाची वेळोवेळी दखल घेतलेली आहे. म्हणून त्यांना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एम.के.सी.एल. तर्फे सलग तीन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2019 मध्ये नागपूर येथे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, 2020 मध्ये राज्यस्तरीय गुणवंत गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार त्याचबरोबर 2022 मध्ये पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. कोरोना काळामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.
नुकतीच त्यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र या खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या उदगीर तालुका सचिव पदी निवड झालेली आहे, आता डॉ. पांडुरंग फड झाले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.