भाऊसाहेब सहकारी बँकेस १ कोटी १५ लक्ष निव्वळ नफा, ०.४६ टक्के नेट एनपीए
उदगीर (एल.पी.उगीले) बँकींग क्षेत्रात उत्तमप्रकारे, दर्जेदार सेवा देणाऱ्या भाऊसाहेब सहकारी अर्बन बँक, लि. उदगीर या बँकेस मार्च २०२४ पर्यंत १ कोटी १५ लक्ष निव्वळ नफा व ०.४६ टक्के नेट एनपीए झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील तळेगावकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली. बँकेच्या एकूण ठेवी ८८ कोटी व कर्जे ५८ कोटी असल्याचेही तळेगावकर यांनी यावेळी सांगितले. २०२३-२४ मध्ये बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने भाऊसाहेब बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने लातूर व तुळजापूर शाखेस मंजुरी दिली आहे व त्या शाखा सध्या उत्तम कार्यरत आहेत. मागील काळात रिझर्व्ह बँकेने मोबाईल बँकिंग ही सेवा चालू करण्यास परवानगी दिल्यामुळे त्याद्वारे बँक आपल्या ग्राहकास उत्तम सेवा देत आहे. पुढील काळात बँक नांदेड, देगलूर व अहमदूर येथे शाखा काढणार असून, बँकेच्या ठेवी २०० कोटी करण्याचाही निर्धार यावेळी तळेगावकर यांनी व्यक्त केला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शन, सुचना व सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून भाऊसाहेब सहकारी बँकेने अतिशय प्रेरणादायी वाटचाल करीत असून या वर्षात बँकेस मिळालेल्या यशाचा आपणास अतिशय आनंद होत आहे. बँकेच्या या यशस्वी वाटचालीत बँकेचे संचालक, सभासद, ग्राहक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत कुलकर्णी, बँकेचे कर्मचारी, बँकेचे सर्व खातेदार व हितचिंतक या सर्वांचा सहभाग असल्याचे बँकेचे चेअरमन भगवानराव पाटील तळेगावकर यांनी यावेळी सांगितले.
चौकट—
सहकार क्षेत्रातील बँकाच्या एकूण प्रगतीसाठी बाजारात आम्ही विश्वास संपादन केला आहे.ग्राहकांच्या उत्कट प्रेमामुळे व विश्वासामुळे बँकेस मागील वर्षात उत्कृष्ट बँक म्हणून राज्यस्तरीय दोन पुरस्कार मिळाले. त्यामुळे ग्राहकांचे मानावे तेवढे आभारी कमीच असल्याचे चेअरमन तळेगावकर म्हणाले.