मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवणाऱ्याला समाज जागा दाखवणार – मनोज जरांगे पाटील
उदगीर (एल. पी. उगिले) : सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा चालू आहे, मात्र या लढ्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले जात आहे. विद्यमान सरकारने तर सकल मराठा समाजाला आश्वासन देऊन, दहा टक्के आरक्षण घोषित केले आहे. मात्र हे आरक्षण आम्हाला नको आहे. सग्या सोयऱ्यासह ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. ते न देता मराठा समाजाचा सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. त्यामुळे आता समाज त्यांना योग्य ती जागा दाखवेल. सकल मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही, किंवा आपली ताकद स्वतंत्र उमेदवार थांबून दाखवण्याचे देखील रद्द केले आहे. त्यामुळे ज्यांना ज्या उमेदवाराला पाडायचे त्यांनी त्या उमेदवाराला पाडावे. आपला पोरखेळ मांडणाऱ्याना पाडण्यात देखील विजयचा आहे.महाराष्ट्रातील जवळपास 92 ते 95 मतदार संघात मराठा समाजाची मते निर्णायक ठरणारी आहेत. हे सत्ताधाऱ्यांना कळाले पाहिजे. राजकारणामध्ये आम्हाला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही. असा गंभीर इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला.
उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाज संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज जरंगे पाटील बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अत्यंत शांततेच्या मार्गाने चालणारे देशातील हे पहिले आंदोलन असेल, जे की आचारसंहितेच्या काळात सुद्धा चालू आहे. कोणालाही विरोध करायचा म्हणून आंदोलन केले नाही. मागासवर्गीय आयोगाने समाज मागासवर्गीय ठरवला असल्यास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला पाहिजे होते. दहा टक्के आरक्षण देऊन निवडणुका उरकून घ्यायचा, आणि मराठ्यांना वेड्यात काढून जिंकायचे. असा डाव घातला होता. यापूर्वीही त्यांनी हेच केले आहे. मात्र आता राजकर्त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
न्यायालयीन लढ्यामध्ये दहा टक्के आरक्षण टिकणार नाही, म्हणून आम्ही विरोध केला. तर माझ्या विरोधात षड्यंत्र रचले गेले. तेव्हा मी त्यांना सोडलं नाही, माझी चौकशी लावली गेली, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पडद्या अडून हल्ला केला. आंतरवाली सराठी येथील आंदोलनाचा मंडप काढण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यावर विविध गुन्हे दाखल करून त्यांना मला व माझ्या सहकाऱ्यांना राज्यातून तडीपार करायचे होते. तडीपार केलात तर दुसऱ्या राज्यात मराठ्यांना घेऊन आंदोलन उभा करेन. जातीसाठी जेलमध्ये सडायलाही तयार आहे. मात्र सग्या सोयऱ्यासह आरक्षण मिळवल्या शिवाय मी स्वस्त बसणार नाही. आरक्षण नाही दिल्यास विधानसभा निवडणूक केली म्हणून समजा. मला पद आणि पैसे नको, मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी माझा लढा आहे. सहा जून पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा सहा करोड मराठ्यांची सभा नारायण गडावर होणार आहे. याचा प्रचार जोरात करा, असे आवाहन समाज बांधवांना त्यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.