कृषि महाविद्यालयाची कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमध्ये शैक्षणिक सहल – अभ्यास दौरा संपन्न

0
कृषि महाविद्यालयाची कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमध्ये शैक्षणिक सहल - अभ्यास दौरा संपन्न

कृषि महाविद्यालयाची कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमध्ये शैक्षणिक सहल - अभ्यास दौरा संपन्न

उदगीर (एल. पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या उदगीर तालुक्यातील कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथील बी.एस्सी. च्या कृषि पदवीच्या चौथ्या सत्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनींची राज्यस्तरीय ( दक्षिण भारत ) शैक्षणिक सहल – अभ्यास दौरा , कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमधील राष्ट्रीय पातळीवरील नामांकित कृषि शिक्षण व संशोधन संस्थां बरोबरच ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन , यशस्वीरित्या संपन्न झाली.विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वृद्धिंगत करणे, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनाशक्तीला पुरेशी संधी उपलब्ध करून देणे, आणि पदवी शिक्षणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व उद्योजकीय विकास रुजविणे अशा उदात्त हेतुने, या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक सहलीमध्ये ७९ विद्यार्थी आणि ०६ प्राध्यापक, प्राध्यापिका सहभागी झाले होते.
या शैक्षणिक सहलीच्या प्रथम चरणामध्ये , बेगलुरू येथील कृषि विद्यापीठातील जैव तंत्रज्ञान प्रयोग शाळा, अनुवंशिकता आणि वनस्पती पैदासशास्त्र या विभागांना प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील तज्ञ डॉ. शकुंतला व डॉ. पृथ्वीराज यांनी वनस्पती अनुवंशिकता शास्त्र व आधुनिक जैवतंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहीती देऊन प्रयोगशाळा दाखवली . तसेच कृषि विस्तार शिक्षण प्रदर्शनालय, वनऔषधी उद्यान, लालबाग उद्यान, सर विश्वेश्र्वारया औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय व एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम इत्यादी संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन उपस्थित तज्ज्ञांकडून माहिती संपादित केली.
सहलीच्या द्वितीय चरणामध्ये , मैसुर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेला भेट देऊन प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती अवगत केली. मैसूर येथील राजवाडा, रेल्वे संग्रहालय, प्राणी संग्रहालय आदी ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या विषयी माहीत जाणून घेतली . तदनंतर , उटी येथील भारतीय मृदा आणि जल संवर्धन केंद्रास भेट दिली.तेथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रसादकुमार यांनी मृदा आणि जल संवर्धनाचे प्रकल्प व तंत्रज्ञान याबाबत सखोल माहिती दिली. उटी येथील उद्यानविद्या संशोधन केंद्रातील तज्ञ डॉ. पि. राजा यांनी डोंगराळ भागातील फलोत्पादन, भाजीपाला व फुलपिकांचे क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठीचे विकसित तंत्रज्ञाना बद्दल मार्गदर्शन व माहिती दिली . डॉ. लावण्या पल्ली यांनी चहा लागवड तंत्रज्ञान, काढणी पश्चात प्रक्रीया व विक्री व्यवस्थापन याबाबत विस्तृत माहीती दिली. प्रसिद्ध टाटा चहा व चॉकलेट उद्योग समूह , गुलाब बाग, बोटॅनिकल गार्डन, उटी लेक व थंड हवेचे ठिकाण डोडाबेट्टा इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या , या सर्व स्थळांची विस्तृत माहीती विद्यार्थ्यांनी अवगत केली.
सदरील शैक्षणिक सहल,अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून सहलीत सहभागी विद्यार्थी,विद्यार्थिनींना कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्यमशीलता,उद्योग व्यवसाय,विक्री व्यवस्थापण,उपलब्ध बाजारपेठा इत्यादी विविध कृषि क्षेत्रातील तांत्रिक मार्गदर्शन व माहिती प्राप्त झाली .
सदरहू शैक्षणिक सहल नंदिग्राम कृषि एवंम ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष डॉ संग्रामजी पटवारी, सचिव गंगाधरराव दापकेकर यांचे आर्थिक व नैतिक पाठबळ लाभले.या सहलीच्या नियोजन व आयोजनासाठी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंगदराव सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.आशोकराव पाटील , आहरण व संवितरण अधिकारी डॉ.अनंद दापकेकर व समस्त प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . ही शैक्षणिक सहल निर्विघ्न हॊण्यासाठी महाविद्यालयाचे सहल प्रमुख डॉ.शिवशंकर वानोळे, डॉ. दिपक पानपट्टे, डॉ. शिवाजी माने, डॉ.सागर खटके, प्रा. स्नेहा मुन व कनिष्ठ सहाय्यक भाग्यश्री निडवंचे यानी अथक परिश्रम घेतले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *