श्यामलाल हायस्कूल मध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक संवाद बैठक संपन्न.
उदगीर (एल.पी.उगीले): येथील श्यामलाल मेमोरीयल हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024 2025 मध्ये इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांची संवाद बैठक संपन्न झाली.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवून कार्यक्रमाची शोभा वाढवली तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या सहसचिव श्रीमती अंजुमणी आर्य उपस्थित होत्या.पालक प्रतिनिधी म्हणून बजरंग शिवशेट्टे, गट साधन केंद्र उदगीर चे विषय तज्ञ धनाजी जाधव , महिला पालक प्रतिनिधी दासरवाड ताई, मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, पर्यवेक्षक राहुल लिमये, प्रा. भारत खंदारे, जेष्ठ शिक्षक संजय देबडवार इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थी,पालक, शिक्षक संवाद बैठकीमध्ये संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी विद्यार्थी व पालकांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. पालकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, आपल्या पाल्यांच्या क्षमता काय आहेत? त्याला कोणत्या विषयांमध्ये अडचणी निर्माण होतात ? आणि त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तणावरहित वातावरणात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होईल? याकडे शिक्षक आणि पालक यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी होणे ही काळाची गरज आहे. भविष्यात जे काही आपण होणार आहोत, त्यासाठी अगदी प्रामाणिकपणे अभ्यास व कार्य करावे यासंबंधी मार्गदर्शन केले.पालक प्रतिनिधी बजरंग शिवशेट्टे, गट साधन केंद्र उदगीर विषय तज्ञ धनाजी जाधव यांनीही या संवाद बैठकीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.
जेष्ठ शिक्षक संजय देबडवार तसेच गणित विषय शिक्षक सतिष बिरादार यांनी विद्यार्थी व पालक यांना विद्यार्थ्यांची शालेय शिस्त,नियमित उपस्थिती, दिलेल्या अभ्यासाचा सराव, स्वय अध्ययन , आरोग्यदायी सवयी,पोषक आहार यासंबंधी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन व्ही कांबळे यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य उमाकांत सूर्यवंशी यांनी केले.