अनिता यलमटे उदगीर (एल.पी.उगीले) आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे युगप्रवर्तक म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिका अनिता येलमटे यांनी श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून लालबहादूर शास्त्री विद्यालयातील मराठी विभागाच्या विभाग प्रमुख तथा प्रसिद्ध साहित्यिका अनिता येलमटे, शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड, नागेश पंगू, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, धनराज काटू, विलास शिंदे, प्रल्हाद येवरीकर, उमाकांत नादरगे, अमित आग्रे हे उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली. पुढे बोलताना अनिता येलमटे म्हणाल्या, अस्पृश्य व बहुजन समाजातील लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभी केली. महिलांच्या व कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले. भारतीय संविधान तयार करताना त्यात स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्वाची तत्वे समाविष्ट केली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला. अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, सर्वच विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आचरणात आणावे. विद्यार्थ्यांना कथेच्या स्वरुपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रमुख पाहुण्या अनिता येलमटे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार प्रल्हाद येवरीकर यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, सुधीर गायकवाड, विनायक करेवाड, संतोष चामले, प्रा. नितीन पाटील, संजय निरणे यांनी सहकार्य केले.