सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी
उदगीर (एल.पी.उगीले)
राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयात आज दिनांक 14-4+ 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्रधानाचार्य मंजुषाताई कुलकर्णी व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय बाबासाहेब आंबेडकर व प्रमुख वक्ते म्हणून श्री पटवारी रामेश्वर आचार्य हे उपस्थित होते. अध्यक्ष प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांच्या हस्ते सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंजुषाताई कुलकर्णी यांचे स्वागत सौ. राचमा मळभागे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बाबासाहेब एकुरकेकर यांचे स्वागत सागरबाई कांबळे व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री पटवारी रामेश्वर आचार्य यांचे स्वागत श्री संकलवाड दत्तात्रेय यांनी केले.
स्वागत आहे नंतर अतिशय सुमधुर अशा आवाजामध्ये आमच्या बालवाडीच्या आचार्या मायाताई कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीत सादर केले. त्यानंतर वर्ग दुसरी मधील विद्यार्थी महेबूब पटेल या विद्यार्थ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अतिशय सुंदर असे भाषण केले त्यामुळे आजच्या प्रमुख वक्त्याकडून 21 रुपये तसेच प्रमुख पाहुणे बाबासाहेब एकुरकेकर यांच्याकडून 101 रुपये व वर्गशिक्षिका सागरबाई कांबळे यांच्याकडून 51 रुपये तसेच शाळेच्या प्रधानाचार्य यांच्याकडून पेन अशा स्वरूपात बक्षीस म्हणून त्या विद्यार्थ्याला देऊन त्याला सन्मानित करण्यात आले.
आजचे प्रमुख वक्ते श्री पटवारी रामेश्वर आचार्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलचे आपले अनमोल असे विचार व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा!”असा मूलमंत्र दिला. तसेच माणूस म्हणून माणसाला जेथे जगता येत नाही जिथे शोषण आणि विषमतेची उतरण आहे जेथे श्वास घेता येत नाही तेथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य आपल्या विचारांच्या प्रकाश किरणांनी आपल्या या मानवतेचा आकाश फुलवीत आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका क्रांतीचे नाव नाही तर हजारो वर्षांच्या भेदभावाला समूळ नष्ट करणारी ऊर्जा आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचा समानार्थी शब्दच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. शिक्षणामुळेच व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते ही गोष्ट त्यांनी जगाच्या लक्षात आणून दिले तसेच त्यांनी आपल्या साहित्यातून जगाला सुंदर अशा अनेक गोष्टी दिल्या व त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अनेक प्रेरक विचार हे लोकांमध्ये रुजतात व त्यातून प्रेरणा घेऊन अनेक जणांचे व्यक्तिमत्व घडतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण जगाला करून दिली जाते अशा या महामानवाला आजच्या या दिवशी कोटी कोटी प्रणाम करण्याचा हा दिवस तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्या भारत देशामध्ये नांदत आहे त्या देशाची राज्यघटना म्हणजेच भारताचे संविधान ज्यांनी लिहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज बदललेला भारत आपल्याला जो पाहायला मिळतोय तो केवळ त्यांनी मांडलेल्या त्यांच्या विचारांमुळे अशा या महामानवाबद्दलचे अनमोल विचार त्यांनी व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात शाळेच्या प्रधानाचार्य मंजुषाताई कुलकर्णी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जन्मदिनी “आपण त्यांच्या विचारांचा हा वारसा असाच पुढे चालू ठेवू ” आणि त्यांच्यासारखे महान कार्य करण्याचे आपण व्रत घेऊ असा निर्धार व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार शाळेतील आचार्य सौ. शानेवार अनिता यांनी आभार मानले त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक वृंदांच्या हस्ते केळी वाटप करण्यात आले व अशा पद्धतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये शब्दबद्ध करून श्री पटवारी रामेश्वर आचार्य यांनी केले.