इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर राज्य करणारे छत्रपती संभाजी राजे – डॉ संतोष पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : बहुभाषाकोविद प्रकांड पंडित, शूरवीर, पराक्रमी , छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे ३२ वर्षाचे आयुष्य जगले. परंतु, या अल्पायुष्यात त्यांनी इतिहासाच्या पानावर व रयतेच्या मनावर लोकल्याणकारी ‘राजा’ म्हणून राज्य केले होते असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील इतिहासाचे संशोधक व अभ्यासक प्रा. डॉ. संतोष पाटील यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमा’ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक, लेखक तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. संतोष पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांनी बालपणापासूनच संघर्षाचा सामना केला. वयाच्या आठव्या वर्षी ते मनसबदार बनले तसेच वयाच्या१४ व्या वर्षी ‘बुधभूषण’ हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. याबरोबरच सातसतक, ‘नखशिखा’ , ‘नायिकाभेद’ आदी ग्रंथांची रचना त्यांनी केली. याबरोबर विविध शत्रूंसोबत एकाकी लढत देऊन, एकही लढाई न हरता मराठा स्वराज्याची पताका अखंड भारतामध्ये फडकविण्याचे कार्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या आग्र्याहून सुटका या प्रसंगावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. नागराज मुळे, प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.