खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक – सौ. उषा कांबळे
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेचे शानदार उद्घाटन
उदगीर (एल. पी. उगिले) : विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांमध्ये एकोपा निर्माण होतो. तसेच स्पर्धेच्या युगात जगत असताना संघर्ष करावा लागतो, याचा अनुभव येतो. तसेच जीवनातील चढ उताराला सामोरे जाण्यासाठी खेळाडू वृत्ती अत्यंत महत्त्वाची ठरते, याचे धडे क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मिळत असतात. असे उद्गार माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ. उषा कांबळे यांनी काढले. त्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
प्रथमतः काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती शीला पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धा तालुका पातळीवरील असून 17 मे ते 22 मे 2024 या कालखंडात उदगीर शहरात नव्याने निर्माण केलेल्या क्रिकेटच्या मैदानावर घेण्यात येत आहेत.
उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना सौ. उषा कांबळे म्हणाल्या की, प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील उदगीर तालुक्यातील क्रिकेट संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. खेळाडूंचा हा सहभाग निश्चितच युवक संघटन मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचे चिन्ह दर्शविते, असेही सांगितले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मंजूर खा पठाण, बाजार समितीचे संचालक ऍड. पद्माकर उगिले, उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले, आशिष पाटील राजूरकर, रंगराव पाटील खाजगी बाजार समितीचे संस्थापक भास्कर पाटील, सोमनाथपूर चे सरपंच प्रदीप पवार, राजेश्वर भाटे, गोविंद भालेराव, अमोल घुमाडे, नाना ढगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रति वर्षाप्रमाणे तालुका पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघाला 51 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र तसेच द्वितीय येणाऱ्या संघास 31 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषक दिले जाणार आहे.
स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने 26 मे रोजी या तालुका पातळीवर विजयी ठरलेल्या संघातून जिल्हा पातळीवर स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
उदगीर येथील क्रीडा स्पर्धा यशस्वी व्हाव्यात म्हणून युवक काँग्रेसचे बंटी कसबे, नागनाथ भूषणवाड, श्रीनिवास एकुरकेकर, श्रीकांत पाटील, फैयाज डांगे, बिपिन जाधव, असरार शेख, सतीश पाटील मानकीकर, सद्दाम बागवान, कपिल शेटकार, कनिष्क शिंदे, प्रीतम गोखले, पप्पू अत्तार, मिथुन शिंदे, रोहन एनाडले, संजय होनराव, अलीम शेख, श्रीकांत शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले.
उद्घाटन पर सामना भाऊ वॉरियर्स विरुद्ध यंग बॉईज क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान घेण्यात आला. या सामन्यात भाऊ वॉरियर्स यांनी 67 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
चौकट 1….
मैदानाची पूजा…..
उदगीर शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून दोन स्टेडियम बनवण्यात येत आहेत. मात्र यावर्षी या क्रिकेट स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उदयगिरी हॉस्पिटलच्या बाजूस शासकीय दूध डेअरी च्या पाठीमागे चवळे यांच्या शेतामध्ये नव्याने क्रीडांगण तयार करून या स्पर्धा घेण्याचे ठरवले, आणि क्रीडांगण तयारही केले. या नवीन मैदानाची पूजा शीलाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
चौकट 2
दोन दोन स्टेडियम नावाला
एकही नाही कामाला?
उदगीर शहरात माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्या कार्यकाळात पारकट्टी गल्लीच्या पाठीमागे भव्य असे स्टेडियम बनवण्याच्या दृष्टीने जागा समतल करण्यात आली, त्या ठिकाणी स्टेडियम बनवण्यासाठी कोट्यावधी रुपयेही आले. काही इनडोर खेळाचे स्टेडियम बनवण्यात आले. इतरही स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या जात होत्या. मात्र त्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी शहरांमध्येच स्टेडियम असावे म्हणून जिल्हा परिषदे शाळेची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन स्टेडियम बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ही कोट्यावधीचा निधी आल्याचे सांगितले जात आहे. दोन स्टेडियम असून देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना स्टेडियमची परवानगी कशी काय मिळाली नाही? यासंदर्भात शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चौकट 3
काँग्रेस नेते खंबीर….
इतर वेळा राजकीय पुढार्यांच्या सभा संमेलनासाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सहज उपलब्ध होणारे क्रीडा संकुल, क्रीडा स्पर्धांसाठी उपलब्ध झाले नाही म्हणून हतबल न होता, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देऊन पर्यायी जागा शोधून या क्रीडा स्पर्धा यशस्वी करत आहेत.