ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न जिव्हाळ्याचे, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार – माजी आ. भालेराव

0
ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न जिव्हाळ्याचे, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार - माजी आ. भालेराव

ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न जिव्हाळ्याचे, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार - माजी आ. भालेराव

उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. सामाजिक जाणीव जपत वाचन चळवळीच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. ही या समाज व्यवस्थेची शोकांतिका आहे. कधीकाळी समाजसेवा म्हणून केले जाणारे काम, आता शासनाच्या नियम आणि अटीच्या अधीन राहून करावे लागत असल्यामुळे मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा दगदग जास्त, अशी अवस्था निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. कारण ते त्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत. असे विचार माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी व्यक्त केले. ते उदगीर तालुक्यातील चांदेगाव येथे ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे हे होते. तर मार्गदर्शक म्हणून माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती वंदना काटकर, मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, डॉ. अमित म्हेत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भालेराव म्हणाले की, ग्रंथालय क्षेत्रामध्ये देखील क्रांतीचे पाऊल लातूर पॅटर्न बनवा, या दृष्टीने लातूर येथील कर्मचाऱ्यांनी आपल्या योजनांमध्ये बदल करावा. ज्या पद्धतीने कंपनी ॲक्ट मध्ये नोंदवलेल्या नोंदणीकृत व्यवसाय धंद्याला अर्थसाह्य मिळते, तशा पद्धतीने अर्थसाह्य मिळवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ग्रंथालयीन कर्मचारी, संस्था अंतर्गत व्यवस्थापन आणि शासन दरबारी बसलेल्या अधिकारी वर्ग आणि त्यांच्या नियम आणि अटी यांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. कित्येक वेळा तांत्रिक अडचणी पुढे करून या कर्मचाऱ्यांना छळले जाते. हे थांबले पाहिजे. ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने कामे करणे थोडेसे त्रासदायक आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींचा विचार करून अधिकारी वर्गाने सहकार्य करणे गरजेचे आहे. आपण आमदार असताना ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांना सहकार्य केले होते. मुंबई येथे जवळपास 50 ते 60 ग्रंथालयीन कर्मचारी आले असता त्यांची व्यवस्था आमदार निवास वर करून त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात संबंधित मंत्र्यांकडे निवेदन पोहोचवण्याची सुविधाही केली होती. वाचनालयाच्या प्रश्नासाठी आपण सदैव चळवळी सोबत आहोत. काही वेळा राजकीय पक्षाची विचारधारा आणि आंदोलकांची विचारधारा यामध्ये ताळमेळ बसत नसला तरी एक सामाजिक प्रश्न म्हणून जनाधार मोर्चाचा विचार करून हे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रंथालयीन कर्मचारी, चळवळीतील कार्यकर्ते यांच्या खांद्याला खांदा लावून आपण राज्यभर काम करायला मागेपुढे पाहणार नाही. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू. असे आश्वासनही याप्रसंगी त्यांनी दिले.
सार्वजनिक ग्रंथालयाचे कर्मचारी आणि शासन यांच्यातील दुवा असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती वंदना काटकर यांनी आपल्या भाषणातून ग्रामीण भागातील वाचनालयाच्या वार्षिक अहवाल, अंकेक्षण अहवाल, तपासणी अहवाल या अनुषंगाने येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि त्यावर मात कशी करावी या संदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता जे जे नवीन नियम आणि अटी येत आहेत, त्याप्रमाणे आपले काम अद्यावत ठेवावे, असेही आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ग्रंथ मित्र सूर्यकांत शिरसे यांनी केले. गेल्या 35 वर्षापासून ग्रंथालय चळवळीमध्ये येत असलेल्या अडचणी आणि कर्मचाऱ्यांची होत असलेली गोची यासंदर्भात त्यांनी आपली कैफियत मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखनाथ नागठाणे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पारसेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चांदेगाव चे सरपंच पंकज मुसने, ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाचे सचिव चंद्रकांत शिरसे, ग्रंथपाल कालिदास शिरसे, चंद्रशेखर ढगे, लक्ष्मण फुलारी, गोविंद पाटील, योगेश्वर पाटील, माधव भोसले, विमल देशपांडे, यशवंत कुलकर्णी, राजपाल देवशेट्टे, अनिल पाटील, सुनील पाटील, रामेश्वर बिरादार नागराळकर, उद्धव तवडे, प्रसाद शिरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *