कृषी महाविद्यालयातील जैव उत्पादने शेतकऱ्यांसाठी वरदान
उदगीर (एल.पी.उगीले) : जैविक उत्पादन हे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात जैविक खत, कीडनाशके, बीज आणि उपाय यांचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादन वाढीचा दर वाढतो आणि पर्यावरणाचे ही रक्षण होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रात जैविक घटकांचा वापर करणे सध्या काळाची गरज झाली आहे. रासायनिक औषधे, खते यांच्या वापरामुळे अत्यंत दुरगामी असे वाईट परिणाम शेतजमिनीमध्ये आढळून आले आहेत. शेतकरी व शेत जमीन डोळ्यासमोर ठेवून, कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा येथे प्रायोगिक तत्त्वावर शेतीसाठी उपयुक्त जैविक उत्पादने निर्मितीचे संशोधनात्मक प्रयोग सुरू आहेत.
जैविक उत्पादनांमध्ये कडुनिंब, करंज, तुळशी, समुद्री शेवाळ, सेंद्रिय कर्ब व इतर सेंद्रिय घटक यांच्यापासून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रयोग चालू आहेत.
अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमांतर्गत, महाविद्यालयामध्ये जैविक उत्पादनांची पाहणी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर अनुभव आधारित कार्यक्रमाचे प्राध्यापक, अधिकारी यांनी केली, विकसित केलेली उत्पादने ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत, आणि हा प्रयोग यशस्वी होणार असे त्यांनी मत व्यक्त केले.
प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या सह समन्वयातून बी. एस्सी. कृषीच्या शेवटच्या वर्षाच्या सहा महिन्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जातो. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील जैव उत्पादनाबाबत जागरूक करून त्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान देऊन त्यांना भविष्यकाळासाठी सज्ज करणे, हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश आहे. या जैव उत्पादनामध्ये कृषी महाविद्यालया मध्ये ऍग्रो नीम, नेका स्ट्रॉंग, रूट मास्टर, व्हर्मी एनगोल्ड, ट्रायको कार्ड, व्हर्मी कंपोस्ट, व्हर्मी वाश, स्टिकर टेक्निकल स्प्रेडर, निमास्त्र, दशपर्णी अर्क इ. सारखी उत्पादने, नमूद केलेल्या सेंद्रिय घटकांपासून बनवणे चालू आहे. यापैकी काही उत्पादने पाहणी झाली असून, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा उदगीर येथे भेट देण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ही उत्पादने शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरणार आहेत, यात कोणतीही शंका नाही. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय संस्थेचे सचिव गंगाधररावजी दापकेकर यांच्या “प्रयोगशाळा ते प्रक्षेत्र” या संकल्पनेतून हा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये हाती घेण्यात आला. तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए . एम. पाटील व जनसंपर्क अधिकारी आनंदरावजी दापकेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आजच्या जैव उत्पादने पाहणी कार्यक्रमाप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांनी भेट देऊन उत्पादनाबद्दल चर्चा केली, व विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांपर्यंत ही उत्पादने पोहोचवण्याची आवाहन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे व्यवस्थापक डॉ. व्ही. एम. शिंदे, कार्यक्रमाचे अधिकारी प्रा. एस. आर. खंडागळे व प्रा. एस. एन. नवले, तसेच प्रा. डी. जी. पानपट्टे, डॉ. एस. बी. माने आदींनी उपस्थित राहून सखोल पाहणी केली व या संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले.