आता निराधारांना थेट बँक खात्यातुन अनुदान मिळणार – तहसीलदार शिवाजी पालेपाड
अहमदपूर (गोविंद काळे) : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या निराधार लाभार्थ्यांना दरमहा अनुदान दिले जाते. ही मदत लाभार्थ्यांना तहसील कार्यालय स्तरावरून बँकेत पाठविण्यात येते, परंतु आता यापुढे ही मदत बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. आता शासनामार्फत सदर अर्थसाह्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून निराधारांना थेट बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. निराधार लाभार्थ्यांनी ३० मे पर्यंत आपली कागदपत्रे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक मोबाईल क्रमांक आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे पाठविण्यात येणार आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे दर महामानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत. लाभार्थ्यांनी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन तहसीलदार शिवाजी पालेपाडे यांनी केले आहे.
निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया अहमदपूर तालुक्यातील संजय गांधी योजना विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत गाव स्तरावरून तलाठ्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. ३० मे पर्यंत कागदपत्रे संजय गांधी योजनेच्या कक्षात जमा करावी लागणार आहेत, तरी मुदतीच्या आत आपली कागदपत्रे वरील कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार पालेपाड यांनी केले आहे.