काळ बदलला, मूल्य,आणि तत्वही बदलले पण आई आहे तीच आहे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : पृथ्वीवरचा स्वर्ग जर कुठे असेल तर ती म्हणजे आई होय.काशीला गेले नाही तरी चालेल पण आईची सेवा करावी काळानुरुप काळही बदलला,तत्वही बदलली आणि मूल्येही बदलली पण आई आहे तीच आहे पुढेही ती आहे तशीच राहणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे शीघ्र कवी, नॅक समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्या मातोश्री उमा उपाख्य नलिनी चौधरी यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील बोलत होते.
मातोश्री उमा उपाख्य नलिनी यांनी वयाची ८० वर्ष पूर्ण करून ८२व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या ‘सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या’चे आयोजन परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील चौधरी गल्लीतल्या श्रीराम मंदिरात करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य वसंत बिरादार पाटील यांनी मातोश्रींना मानपत्र अर्पण केले. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की भारतीय संस्कृतीत आई वडिलांना परम आदरणीय दैवत मानले गेले आहे.भक्त पुंडलिकाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ ठरली. त्याचेच एक प्रतीक म्हणून चौधरी कुटुंबियांनी हा सोहळा आयोजित करून आई बद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत असून ही बाब आजच्या काळाला प्रेरणादायी ठरणारी आहे.अशा प्रकारचे मातृगौरवाचे सोहळे हे समाजाला नवी दिशा देणारे ठरतात, असे म्हणून- ‘तुका म्हणे माय बापे ! अवघे देवाची रूपे!’ असा संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भही दिला. यावेळी कवी प्रा. डॉ.मारोती कसाब, सौ.रोहिणीताई कुलकर्णी देऊळगावकर, डॉ.स्मिता वैद्य, वैभव कुलकर्णी सत्येंद्र चौधरी, देवाशीष चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मातोश्री नलिनी दिगंबरराव चौधरी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. या प्रसंगी नलिनी दिगंबरराव चौधरी यांची नात कु.गौरी चौधरी हीने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुंदर आणि नेटक्या संयोजनाबद्दल त्यांनी चौधरी कुटुंबीयांचे कौतुकही केले. याप्रसंगी मातोश्री उमा उपाख्य नलिनी यांची ग्रंथ तुला तसेच पेढे, धान्य आणि गुळ तुलाही करण्यात येऊन त्याचे तिथेच वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महात्मा फुले महाविद्यालयातील प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. मारोती कसाब, डॉ. दिगंबर माने, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, कार्यालयीन कर्मचारी श्री. चंद्रकांत धुमाळे, हुसेन शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य विजयेंद्र चौधरी यांनी केले तर आभार डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.