राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान – डॉ. बब्रुवान मोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचे कार्य लोककल्याणकारी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले, त्यांचे कार्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान आहे असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय इतिहास विभागप्रमुख डॉ.बब्रुराव मोरे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक, शिक्षण तज्ज्ञ तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर डॉ. बब्रुवान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलतांना डॉ. मोरे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी राज्य करून मराठा साम्राज्याची पताका अखंड भारतामध्ये फडकविण्याचे कार्य केले. त्याचबरोबर मुघलाच्या काळात हिंदू धर्मावर आलेल्या धार्मिक सुलतानी संकट दूर करण्याचे कार्य अत्यंत मुत्सुदी पद्धतीने करतांना त्यांनी भारतातील नष्ट करण्यात आलेले शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अटक पासून कटक पर्यंत केला. तसेच जल व्यवस्थापन करून प्रजेला सुखी करण्याचे कार्य अहिल्यादेवी होळकर यांनी करून दाखविले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांनी अहिल्यादेवी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना म्हणाले की, ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता अशा काळात अहिल्यादेवी होळकरांनी तब्बल २८ वर्षे यशस्वीपणे राज्यकारभार चालवला. तसेच स्त्रियांची सैन्यफौज निर्माण केली. विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली. तसेच त्या भारतातील पहिल्या स्त्री आहेत ज्यांनी वैदिक सनातनपद्धतीचा विरोध करून पतीचे निधन झाल्यानंतर सासरे मल्हाराव होळकर यांच्या आदेशानुसार सती जाणे टाळले. खऱ्या अर्थाने सतीप्रथा बंद करण्याची कार्य अहिल्यादेवी होळकरांनी केले, असे ही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने यांनी केले तर आभार क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांनी मानले. यावेळी ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. संतोष पाटील , प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.