शिवराज्याभिषेकामुळेच स्वराज्याला ‘सार्वभौमत्व’ प्राप्त झाले – डॉ. संतोष पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मूल्ये खोलवर रुजली गेली. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. शिवराज्याभिषेकामुळे स्वराज्याला सार्वभौमत्व प्राप्त झाले, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. संतोष पाटील यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘ शिवस्वराज्य दिन ‘ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष पाटील बोलत होते. या प्रसंगी विशेष उपस्थितीमध्ये राणीसावरगाव येथील प्रा. दुल्हेखान पठाण हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना समान पातळीवर आणले. सर्व प्रकारचा भेदभाव नष्ट केला. म्हणून आजही जगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला एक आदर्श राज्य म्हणून ओळखले जाते, असेही ते यावेळी म्हणाले.
शिव- फुले- शाहू- आंबेडकर’असा निनाद व्हावा
अध्यक्षीय समारोप करताना सुप्रसिद्ध लेखक समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी चटणी भाकरी खाऊन सोबत राहणा-या मावळ्यांना तसेच अठरा पगड जातींना सोबत घेऊन वाटचाल करणा-या नेतृत्वाचा हा स्वराज्याभिषेक सोहळा अहल्याचे नमूद करून रायगडाचे बांधकाम हिंदोजी इंदूलकर यांनी केले असल्याचे म्हटले. छत्रपतींनी स्वाभिमान आणि पुरोगामी विचार देत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला. म्हणून आता तरी ‘ शिव- फुले- शाहू- आंबेडकर’असा निनाद व्हावा, असे म्हणून सध्याच्या राज्यकर्त्यांनी नव भारताच्या उभारणीसाठी शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील ध्येय धोरणे अवलंबली पाहिजेत असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन ह.भ.प. डाॅ. अनिल महाराज मुंढे यांनी केले. यावेळी डॉ. प्रशांत बिरादार, डॉ.पी.पी.चौकटे, डॉ. किरण गुट्टे, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापुरे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.