महात्मा बसवेश्वरमध्ये एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास केंद्राचे उद्घाटन
लातूर (प्रतिनिधी) : प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम व तत्सम शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले प्रवेशाचे आवाहन लातूर दि. ०८ मे सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये एमपीएससी/यूपीएससी परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल आहे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि व्यक्तिमत्व विकास केंद्र शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी कार्यान्वित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, केंद्र समन्वयक तथा कला शाखा समन्वयक डॉ. बाळासाहेब गोडबोले, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. सिद्राम डोंगरगे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक करताना डॉ. बाळासाहेब गोडबोले म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे महात्मा बसवेश्वरांच्या वचनाची परिपूर्ती आणि श्री देशीकेंद्र महाराज यांच्या विचारांचा वसा घेऊन सातत्याने सन १९७० पासून मराठवाड्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू, गरीब आणि गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण सेवा देत आहे. या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम, बी.एस.डब्ल्यू. आणि बी.सी.ए. अशा सहा शाखा असून समाजशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, भूगोल, इतिहास आणि राज्यशास्त्र अशा सहा शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण दिले जात असून समाजशास्त्र, भूगोल आणि तत्त्वज्ञान या तीन विषयाचे संशोधन केंद्र आहे.
यावेळी बोलताना डॉ. सिद्राम डोंगरगे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग, कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि सांस्कृतिक विभागाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक विकास सातत्याने सर्वांच्या सहकार्याने केला जातो.
यावेळी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रवेश तर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी, बी.एस.डब्ल्यू. आणि बी.सी.ए. प्रथम वर्षाचे सरळ प्रवेश सध्या सुरू आहे. या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे मिळावे यासाठी महाविद्यालयातील विविध विषयाच्या प्राध्यापकांची टीम तयार करून विद्यार्थ्यांना आय.ए.एस., आय.पी.एस., एफ.ए.एस. आणि तत्सम परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्राची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
या केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षा तज्ञ, अनुभवी व प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासोबत समाजकार्य शाखा समन्वयक डॉ. दिनेश मौने, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव दंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यशवंत वळवी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. राजकुमार लखादिवे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. विजयकुमार सोनी, गणित विभाग प्रमुख डॉ. सुजित हंडीबाग, हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोहर चपळे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंतोष स्वामी, दुग्धशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनायक वाघमारे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक चाटे आणि तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. शीतल येरुळे यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे
महाविद्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसेचिंचोलीकर, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडीगावे आणि इतर सर्व संचालक मंडळ पदाधिकाऱ्यांनी केले असून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
तेव्हा दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि व्यक्तिमत्व विकास केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, केंद्र समन्वयक डॉ. बाळासाहेब गोडबोले आणि इतर सर्व शाखा समन्वयक आणि विभागप्रमुख यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्ही.एन.वलांडे, योगेश मोदी, राजाभाऊ बोडके, अशोक शिंदे, श्रीशैल्य पाटील यांनी परिश्रम घेतले.