किलबिल नॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये ‘जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण ‘ प्रशिक्षण संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : एकविसाव्या शतकातील कौशल्ये आणि शिक्षणाची भविष्यातील दिशा या विषयावर आधारित किलबिल नॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये संस्थेचे संचालक श्री ज्ञानोबा भोसले यांच्या पुढाकाराने शाळेतील सर्व शिक्षकांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण दिनांक 3 जून ते 4 जून 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार अंतर्गत भविष्यातील शिक्षणाचे चार आयाम, विद्यार्थ्यांचे स्तर आणि त्यांच्या शिक्षणाची दिशा, कामाच्या प्राधान्य क्रमाचे टप्पे, विद्यार्थ्यांमधील विविध बुद्धिमत्ता, एकविसाव्या शतकातील अत्यंत महत्त्वाची कौशल्ये, ब्लूम टेक्झोनोमी, मुलांच्या शिकण्यासाठीच्या महत्त्वाच्या सहा पायऱ्या, सेल्फी विथ सक्सेस तसेच शिक्षकांनी अध्ययवत राहणे का गरजेचे आहे, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर आधारित किलबिल नॅशनल इंग्लिश स्कूल मधील जवळपास 70 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच प्रशिक्षणामध्ये समजलेल्या बाबी सर्व प्रशिक्षणार्थींकडून वर्कबुक मध्ये नोंदवून घेण्यात आले. प्रत्येक शिक्षकांचा प्रशिक्षणामध्ये सक्रिय सहभाग राहावा यासाठी गट करून त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यात आला. गटामध्ये विविध ऍक्टिव्हिटी, मोकळीका घेऊन अतिशय आनंददायी वातावरणामध्ये, सहज सोप्या संवादातून प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षण देण्यासाठी श्री बसवेश्वर कल्याणकस्तुरे, राज्य प्रशिक्षक, इमाबक हे आले होते. त्यांनी दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये अतिशय नियोजनबद्ध भविष्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि कौशल्यपूर्ण प्रगती कशी साधावी, हे वरील बाबींच्या आधारे आपल्या ओघवत्या भाषेत सादर केले. या प्रशिक्षणातून सर्व शिक्षकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. शेवटी सर्व शिक्षक अतिशय आनंदी व प्रेरित झाल्याचे दिसून आले. या प्रशिक्षणा दरम्यान वाबळेवाडी शाळेचे श्री दत्तात्रय वारे गुरुजी यांनी सुद्धा सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांसोबत ऑनलाईन संवाद साधला. त्यामुळे सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर प्रभाव पूर्ण चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. या प्रशिक्षणातून सर्व शिक्षकांना आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शिकण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे सोपे जाईल असे प्रशिक्षणार्थी यांनी मत व्यक्त केले.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी किलबिल नॅशनल स्कूलचे संचालक श्री ज्ञानोबा भोसले यांनी अतिशय प्रभावी नियोजन केले होते. उद्घाटनपर कार्यक्रमांमध्ये त्यांनी सांगितले की, “प्रत्येक शिक्षकांना अपडेट होण्यासाठी आणि भविष्यातील स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे”. यावेळी उपक्रमशील पदवीधर शिक्षक डॉ. मारुती कदम हे उपस्थित होते, त्यांनी सुलभक श्री बसवेश्वर कल्याणकस्तुरे यांचा परिचय आणि त्यांचे कार्य आपल्या प्रास्ताविकेमध्ये विशद केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पाटील यांनी सर्व भौतिक सुविधा, वर्गरचना यासाठी वैयक्तिक लक्ष दिले. शाळेतील शिक्षक श्री सचिन जगताप, राजकुमार आणि सर्व कर्मचारी यांनी प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अतिशय मेहनत घेतली.