पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांचे तात्काळ निलंबन करा

0
पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांचे तात्काळ निलंबन करा

पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांचे तात्काळ निलंबन करा

मुंबई (प्रतिनिधी) : महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, आत्महत्या, हत्या याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. बदलापूर येथील घटनेनंतर तर राज्यातील महायुती सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात पूर्णत: अपयशी ठरले असून पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे तात्काळ निलंबन करा आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पटोले यांनी म्हटले आहे की, बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर १५ दिवस अत्याचार सुरू होते, हे उघड झाले आहे, शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही गायब आहे. बदलापूर पोलिस ठाण्यामधील महिला अधिका-यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची मुंबईत बदली करून एकप्रकारे बक्षीसच दिले आहे. ही शाळा भाजप-संघाशी संबंधित असल्याने शाळा संचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे त्यात योगदान दिसत आहे. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पटोले म्हणाले की, राज्यातील शेतकरी अस्मानी- सुलतानी संकटात सापडला आहे. मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजून पंचनामे झाले नाहीत, मदत पोहोचणे तर दूरची गोष्ट आहे. मागील पावसाळ्यात झालेली नुकसानभरपाई शेतक-यांना मिळालेली नाही.

सोयाबीन, धान हमीभावाकरिता पंतप्रधानांना पत्र
नाना पटोले यांनी म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकार मोठ्या प्रमाणात आयात करून खास मित्राला फायदा करून देत आहे आणि शेतक-याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे, ही आयात थांबवली पाहिजे. सरकारने सोयाबीनला ७ हजार रुपये भाव जाहीर करावा तसेच धानाला ३ हजारांचा भाव जाहीर करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली असून त्या संदर्भात आपण पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे ते म्हणाले.

जातनिहाय जनगणना होणे गरजेचे
शोषित, वंचित, पीडित समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक फायदा मिळावा व समाजाच्या मुख्य प्रवाहात या घटकांना आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. या समाजघटकांचे भले व्हावे ही भूमिका आहे. मात्र भाजप सरकार मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत नाही, उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद करत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकदा आरक्षण संपवले पाहिजे, अशी जाहीर भूमिका मांडलेली आहे, असे पटोले म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *